कंगनाला मुंबई पोलिसांकडून समन्स आज पोलीस ठाण्यात हजर राहणार

 


मुंबई -  बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतला मुंबई पोलिसांनी समन्स बजावले आहे. बॉलिवूडचे ज्येष्ठ कलाकार जावेद अख्तर यांनी कंगनाविरुद्ध तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी मुंबई पोलिसांकडून तिला समन्स बजावण्यात आले असून तीला उद्या शुक्रवार २२ जानेवारी रोजी जुहू पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगितले आहे .

बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते आणि लेखक जावेद अख्तर यांनी कंगनावर मानहानीचा दावा केला होता. डिसेंबर २०२० मध्ये जावेद अख्तर यांनी अंधेरी कोर्टात कंगनाच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल केला होता. कंगना राणावत हिने एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत जावेद अख्तरच्या प्रतिमेला दुखविणार्‍या काही गोष्टी केल्या असल्याचा आरोप केला जात आहे. डिसेंबर २०२० मध्ये कोर्टाने जुहू पोलिसांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. यानंतर १६ जानेवारीला अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. मात्र १६ जानेवारीला पोलिसांनी तपासाचा अहवाल सादर करण्यासाठी अधिक वेळ मागितला. त्यानंतर कोर्टाने हा अहवाल १ फेब्रुवारीपर्यंत देण्यास मुदतवाढ दिली आहे .

 जावेद अख्तर यांनी अभिनेता ऋतिक रोशन याच्याविरोधात बोलू नये यासाठी दबाव टाकल्याचा आरोप कंगना राणावतने अनेक मुलाखतींमध्ये केला आहे. त्यामुळे या आरोपांविरोधात जावेद यांनी कोर्टात अब्रु नुकसानीचा दावा दाखल केला. कंगनाने एका मुलाखतीत जावेद यांच्यावर गंभीर आरोप केले होते. “एकदा जावेद अख्तर यांनी मला त्यांच्या घरी बोलवून सांगितले होते की, राकेश रोशन आणि त्यांचे कुटुंबीय खूप मोठे लोक आहेत. तू जर त्यांच्याविरोधात माफी मागितली नाही तर तुझे नुकसान होईल. ते तुला तुरुंगात टाकतील. त्यावेळी तुझ्या हातात काहीच राहणार नाही. त्यावेळी तुला आत्महत्या करावी लागेल, असे त्यांचे शब्द होते. त्यांना असे का वाटते की, मी जर ऋतिक रोशनची माफी नाही मागितली तर मला आत्महत्या करावी लागेल. ते माझ्यावर इतक्या जोरात ओरडले होते की माझे पाय कापयला लागले होते”, अशी कंगना त्या मुलाखतीत म्हणाली होती.