स्व उंडाळकरांच्या प्रतिमेस काकस्पर्श तर उपस्थित झाले निःशब्द!..

समाजातील देव माणूस तृप्त झाल्याच्या भावनेने कंठ फुटले. 

      स्व विलासकाका पाटील उंडाळकर यांचा रक्षाविसर्जन विधी राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांसह त्यांच्या हजारों कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत झाला.यावेळी हिंदू धर्माच्या रूढी प्रमाणे रक्षाविसर्जन विधी झाल्यावर मृत आत्म्यास नैवेद्य ठेवला जातो. त्याप्रमाणे विधी स्थळी स्व विलासकाका यांची प्रतिमा दर्शनासाठी ठेवण्यात आली होती . दरम्यान हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या जनसमुदाय मधून  एक कावळा थेट प्रतिमेवर बसला अन नैवेद्य शिवला. या काही क्षणात घडलेल्या प्रसंगाने काकांच्या वर प्रेम करणारे हजारो उपस्थित निःशब्द झाले व विधी स्थळावरून बाहेर पडताना समाजातील देव माणूस तृप्त झाला असल्याची भावना सर्वांनी व्यक्त केली. या प्रतिमेला केलेल्या काकस्पर्शाची चर्चा दिवसभर मीडिया मध्ये व लोकांच्यात सुरू होती.

                  प्रत्येक धर्मात एखाद्या प्राण्याला अथवा पक्षाला अनन्यसाधारण महत्व असून कोणत्या ना कोणत्या सुख अथवा दुःख कार्यक्रमात ,विधीकरिता त्यांना मानाचे स्थान आहे.हिंदू धर्मात ही व्यक्तीच्या मृत्यू पश्चयात होणाऱ्या प्रत्येक विधीसाठी "कावळा"या पक्षाची गरज असते. नसेल कावळा तर होईल घोटाळा हे आपण अनेक रक्षाविसर्जन विधी दरम्यान पहावयास मिळत असते.मग हा विधी रक्षाविसर्जन चा असो अथवा तेरावा असो नैवेद्य कावळ्याने शिवल्याखेरीज तो विधीच पूर्ण होत नाही.

             या कावळ्याची आख्यायिका अशी,हिंदुपुराण मध्ये कावळ्याला देवपुत्र मानले गेले आहे.एका कथेनुसार देवराज इंद्रपुत्र जयंत यांनी कावळ्याचे रूप घेऊन  माता सीतेला जखमी केले.तेंव्हा प्रभू रामचंद्र यांनी ब्रह्मास्त्र वापरून जयंतच्या डोळ्याला इजा केली.जयतांनी आपल्या केलेल्या कृत्याची माफी मागितली अन प्रभू रामचंद्र यांनी माफ करून त्याला वरदान दिले की,तुला अर्पण केलेले भोजन पितरांना मिळेल, तेंव्हापासून पितरांना तृप्त करण्यासाठी कावळयाना पिंड अन्न दान दिले जाते.या आख्यायिका प्रमाणे हिंदू धर्मात कावळ्याला मृत्यूपाश्चात   अनन्य साधारणमहत्त्व आहे.

                    उंडाळे येथे राज्याचे माजी मंत्री स्व विलासकाका पाटील उंडाळकर यांचा रक्षाविसर्जन विधी बुधवारी झाला.राजकीय सामाजिक, शैक्षणिक ,साहित्यिक मान्यवरांसह हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. ज्या ठिकाणी विधी संपन्न होणार होता.त्या ठिकाणी यापूर्वी कै आशादेवी पाटील यांच्या मृत्यू पश्चात विधी झाला होता. यावेळी हा विधी करताना कावळ्याची उणीव भासली होती.रक्षाविसर्जन विधी स्थळी मोठया संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.यावेळी बाहेर गावावरून येणाऱ्या लोकांकरिता स्व विलासकाका पाटील यांची   प्रतिमा दर्शनी दर्शनासाठी ठेवण्यात आली होती.हिंदू धर्मातील रीतिरिवाजा प्रमाणे विधी सुरू असताना परिसरामध्ये एकही पक्षी पहावयास मिळाला नाही. विधी संपन्न झाला अन त्यांचे पुत्र अँड उदयसिंह पाटील सह त्यांच्या कुटुंबियाने दर्शन घेऊन बाजूला होऊ लागले. इतक्यात कावळे येऊ लागले. त्यातील एक कावळा आला ते थेट स्व विलासकाका यांच्या प्रतिमेवर जाऊन बसला .थोडा वेळ थांबून नैवेद्य शिवला अन दक्षिण दिशेला निघून गेला.काही क्षणात हे घडत असताना उपस्थित मात्र निःशब्द होऊन हा प्रसंग बघत होते. बाहेर पडताना समाजासाठी अहोरात्र झटणारा माणसात देव पाहणारा देव माणूस तृप्त झाला असल्याच्या भावना व्यक्त करत अश्रूंना वाट मोकळी करून दिली. कावळ्याने नैवेद्य शिवणे अन मृत आत्मा तृप्त होणे हे जरी आजच्या विज्ञान युगात मान्य नसले तरी हिंदू धर्मात ही रूढ ,परंपरा कायम मानली जात आहे.या क्षणिक प्रसंगाची रक्षाविसर्जन विधी दिवशी सोशल मिडियावर चर्चा सुरू होती.

 - पत्रकार : प्रकाश पाटील, उंडाळे