पाटण तालुक्याची मार्गदर्शक ठरलेली जननायक व नामदार दिनदर्शिका घरोघरी पोहोचवा : ना.शंभूराज देसाई

 

दौलतनगर | कृष्णाकाठ वृत्तसेवा :

संपूर्ण तालुक्यातील यात्रा उत्सव, जयंत्या, पुण्यतिथ्या व विविध गावच्या ठळक उपक्रमांच्या समावेशाने सबंध पाटण तालुक्याचा आत्मा ठरलेली जननायक दिनदर्शिका प्रत्येकाच्या घरोघरी पोहोचवा असे आवाहन राज्याचे गृह राज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई यांनी व्यक्त केले.

बहुले (ता. पाटण) येथील युवा संघटक मोहनदादा पानस्कर मित्र मंडळाच्या वतीने ना. शंभूराज देसाई यांच्या गौरवार्थ गेल्या आठ वर्षापासून संकलित करण्यात येत असलेल्या जननायक व नामदार या दोन्ही दिनदर्शिकांचे प्रकाशन ना. शंभूराज देसाई यांच्या हस्ते दौलतनगर येथील कारखाना संकुलात करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमास मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, युवा नेते यशराज देसाई, शिवदौलत बँकेचे अध्यक्ष अॅड. मिलींद पाटील, माजी उपसापती डी. आर. पाटील, जयराज देसाई, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक पांडुरंग नलवड़े, युवा नेते नवनाथ पाालेकर ,उद्योजक प्रशांत यादव, विशाल पाटील, मनिष कवटेकर आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. या वेळी ना. देसाई पुढे म्हणाले, मोहनराव पानस्कर यांच्या संकल्पनेतून प्रकाशित होणारी ही दिनदर्शिका अतिशय परिपूर्ण आहे. तालुक्यातील प्रत्येक विभागाचा यात समावेश आहे. सण-संस्कृती याची चांगली मांडणी त्यांनी जननायक व नामदार या दिनदर्शिकातून केलेली आहे. अगदी मनापासून ते दरवर्षी या दोन्ही दिनदर्शिका तालुक्यातील जनतेसाठी संकलीत करीत असतात. या दोन्ही दिनदर्शिकांचे तालुक्यातील जनता आवर्जून अवलोकन करीत असते.त्यामुळे हा उपक्रम निश्चितच लोकोपयोगी असून मोहनराव पानस्कर यांच्या या निष्ठापूर्ण कामाचे मी मनापासून कौतुक करीत असल्याचेही नामदार शंभूराज देसाई यावेळी म्हणाले.

प्रारंभी मोहनराव पानस्कर यांनी नामदार शंभूराज देसाई यांचे स्वागत केले, मिलींद माळी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

कार्यक्रमास लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याचे संचालक, बँकेचे संचालक, तालुक्यातीत विविध गावचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.