सातारा जिल्ह्यास बर्ड फ्ल्युचा अद्याप धोका नाही पशुसंवर्धन विभाग दक्ष- डॉ. अंकुश परिहार




सातारा दि.11 (जिमाका): सातारा जिल्ह्यात बर्ड फ्ल्यु प्रादुर्भावाचा अद्याप कोणताही धोका नसून पोल्ट्रीधारक शेतकऱ्यांनी घाबरुन जावू नये. बर्ड फ्ल्यु रोगाचे प्रतिबंधात्मक उपाययोजना भाग म्हणून रोग सर्वेक्षण केले जात असून पशुसंवर्धन विभाग दक्ष राहून कामकाज करीत आहे. तसेच जिल्ह्यात जर कावळे, पोपट, बगळे, वन्य पक्षी किंवा स्थलांतरीत पक्षी मरतूक झाल्याचे निदर्शनास आले तर नागरिकांनी त्वरीत माहिती पशुसंवर्धन विभागास देवून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उप आयुक्त डॉ. अंकुश परिहार यांनी केले आहे.

परंपरागत भारतीय अन्न उकळून शिजवण्याच्या पद्धतीनुसार कोंबडी मास व अंडी खाणे हे पूर्णत: सुरक्षित असून पक्षी व अंडी विक्रीवर कोणतेही निर्बंध लागू नाहीत. त्यामुळे जनतेने कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये किंवा अफवा पसरवू नये.

बर्ड फ्ल्यु रोगाचे विषाणु प्रामुख्याने स्थलांतरीत पक्षी किंवा अन्य वन्यपक्षी यांमध्ये आढळून येत असल्याने जिल्ह्यामधील सर्व जलाशये, तलाव किंवा पाणवठ्याच्या जागी कोणीतीही असाधरण पक्षी मरतूक बाबत दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. बर्ड फ्ल्यु रोगाचा संभाव्य धोका ओळखून सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे. प्राण्यांमधील सांसर्गिक व संक्रामक रोक प्रतिबंधक व नियंत्रण अधिनियम 2009 अन्वये बँकयार्ड पोल्ट्री किंवा कोणत्याही व्यावसायिक पोल्ट्री मध्ये जर मोठ्या प्रमाणात पक्षांमध्ये तरतूक आढळून आली तर जबाबदार नागरिक किंवा व्यवसायीक या नात्याने तशी माहिती त्वरीत नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याला देणे बंधनकारक आहे. पक्षांमधील कोणत्याही असाधारण मरतूक लपवण्यात येवू नये तशी सुचना संबंधित पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती तथा तालुका नोडल अधिकारी यांनाही तातडीने देण्यात यावी म्हणजे प्रशासनास वेळीच योग्य ती कार्यवाही करणे सोयीचे होईल.

जिल्ह्यामध्ये 19 व्या पशुगणनेनुसार 39 लाख 79 हजार 611 इतकी कुक्कुट पक्षी संख्या आहे. आजमितीला नव्याने मोठ्या प्रमाणात देशी पक्षी संगोपन, ब्रॉयलर संगोपन, लेअर पक्षी संगोपनाचे व्यवसायात वाढ झालेली असून सर्व पोल्ट्री व्यवसायीकांनी त्यांचे पक्षी फार्ममध्ये जैव सुरक्षा नियमांचे कोटेकोरपणे पालन करुन पक्षांच्या आरोग्याची दक्षता घ्यावी. जिल्ह्यामधील जे व्यवसायीक 5 हजार पेक्षा जास्त पक्षांचे संगोपन करत आहेत किंवा 500 पेक्षा जास्त क्षमतेचे अंडी उबवणूक यंत्राद्वारे पिले निर्मिती करीत आहे त्यांनी जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांच्या कार्यालयात नोंदणी करणे बंधनकारक आहे, असेही जिल्हा पशुसंवर्धन उप आयुक्त डॉ. परिहार यांनी कळविले आहे.