वेदनेतून काव्य जन्माला येते : सुनिती सु.र.


तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा :

कोणतेही काव्य हे अनुभवातून जन्माला येते, वेदनेतून जन्माला येते. ‘साठवण’ या कवितासंग्रहाला सुख दुःखाची झालर आहे असे प्रतिपादन जन आंदोलनाच्या राष्ट्रीय  समन्वयक सुनिती सु.र. यांनी केले. त्या कवि प्रदिप पाटील यांच्या ‘साठवण’ या कवितासंग्रहाच्या प्रकाशनप्रसंगी बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर पं.स.सदस्या सीमाताई मोरे, कुसुमताई करपे, प्राचार्य डाॅ.अरुण गाडे, कवी प्रदीप पाटील, कवी उध्दव पाटील, कवी व लेखक अनिल म्हमाणे, लक्ष्मण पाटील, कार्यकारी  अभियंता सुरेान हिरे, सहाय्यक अभियंता रोहिणी चव्हाण व अन्य मान्यवर उपस्थित होते.

स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून हा कार्यक्रम करण्यात आला होता. काकासाहेब चव्हाण काॅलेज तळमावले आणि प्रयास प्रकाशन कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने प्रकाशनाचा हा समारंभ आयोजित केला होता.

वांग मराठवाडीच्या धरणामुळे मी 20 वर्षे येथील लोकांची सुख दुःखे अनुभवत आहे. आपल्याला आपला गाव सोडून जावे लागते त्यावेळी काय अवस्था होते ही मी अनुभवली आहे. कवी प्रदीप पाटील यांचा कवितासंग्रह हा याचेच प्रतिनिधीत्व करतो असेही सुनिती सु.र. पुढे बोलताना म्हणाल्या.

अनिल म्हमाणे म्हणाले की, साठवण हा कवितासंग्रह लढण्याची नेहमी आठवण करुन देत राहील. सदर कविता संग्रह हा साहित्य प्रवाहाच्या विरुध्द आहे. ऋणानुबंधांना बोलते करण्याचे काम या पुस्तकाने केले आहे.

याप्रसंगी कवी प्रदीप पाटील, सीमा मोरे, कुसुमताई करपे, प्राचार्य डाॅ.अरुण गाडे यांनी आपली मनोगते व्यक्त केली. प्रारंभी कार्यक्रमाची सुरुवात रोपटयाला पाणीघालून करण्यात आली. 

मान्यवरांचे स्वागत पुस्तक आणि साठवण काव्यसंग्रहाची प्रतिमा असलेले सन्मानचिन्ह देवून करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जी.एन.पोटे यांनी केले. सुत्रसंचालन डाॅ.संदीप डाकवे तर आभारप्रदर्शन अॅड.अधिक चाळके यांनी केले.

कार्यक्रमास मेंढ गावातील बहुतांशी लोक उपस्थित होते. कार्यक्रमावेळी अनेकांना धरणाच्या, आपल्या गावच्या आठवणीने भरुन आले. कवी प्रदीप पाटील व सुनिती सु.र. यांचा कंठ देखील दाटून आला होता. प्रकाशनाच्या कार्यक्रमात भावनिकता आल्याने या कार्यक्रमाने एक वेगळी उंची गाठली होती. महाविद्यालयीन मुले यांनी देखील या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.