अपघात पाहताच आ. पृथ्वीराज चव्हाण यांचा ताफा थांबला आणि...

माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज बाबांची संवेदनशीलता. अपघात पाहून थांबवली गाडी ताफ्यातील गाडीतून जखमी वृद्धेला रुग्णालयात केले दाखल.

कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा : माजी मुख्यमंत्री आ पृथ्वीराज चव्हाणांचे संवेदनशीलतेचे दर्शन कराडच्या जनतेला आज पाहायला मिळाले. आ पृथ्वीराज बाबा सैदापूर येथे एका कार्यक्रमासाठी गेले होते. तेथून परतत असताना सैदापूर येथील कॅनाल जवळ त्यांना लोकांची गर्दी दिसली त्यांनी आपली गाडी थांबविण्याची सूचना केली व चौकशी केली असता समजले कि, एक अपघात झाला आहे व यामध्ये एक वयोवृद्धा जखमी झाली आहे. पृथ्वीराज बाबांनी स्वतः गाडीमधून उतरून अपघातग्रस्त वयोवृद्धेची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. त्या वृद्धेला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले व त्यासाठी आपल्या ताफ्यातील वाहनाची व्यवस्था केली. त्या वयोवृद्ध आजीला हाताला जबर दुखापत झाली आहे तसेच डोक्याला सुद्धा थोडा मार लागला आहे. या आजींचे नाव मालन सुतार असे आहे त्या सैदापूर गावच्या रहिवाशी आहेत. 


पृथ्वीराज बाबांचे अनेक गुणात्मक रूप कराडकरांनी आजपर्यंत पाहिले आहेत. आज त्यांच्या संवेदनशीलतेचे रूप कराडकरांनी पाहिले. त्यांच्यासमवेत नगरसेवक इंद्रजीत गुजर, सैदापुरचे सचिन पाटील, अ‍ॅड. अमित जाधव, पृथ्वीराज बाबांचे स्वीय सहायक गजानन आवळकर आदी यावेळी उपस्थित होते. पृथ्वीराजबाबांच्या संवेदनशीलतेची परिसरात व सोशल मीडिया वर चर्चा सुरु आहे.