दर्पणकारांना ‘स्टेन्सिल पेपर आर्ट’ मधून मानवंदना
तळमावले/वार्ताहर :

मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जंयतीनिमित्त प्रतिवर्षी आपल्या कलेच्या माध्यमातून दर्पणकरांना अनोखी मानवंदना देण्याचा प्रयत्न पत्रकार डाॅ.संदीप डाकवे हे करत आहेत. या वर्षी ‘स्टेन्सिल पेपर आर्ट’ मधून आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे चित्र रेखाटून त्यांना आदरांजली वाहिली आहे.

डाॅ.संदीप डाकवे यांनी यापूर्वी ठिपके, स्क्रिबलिंग, शब्द, लेखणी, रांगोळी, पोस्टर इ.विविध माध्यमातून दर्पणकारांची सुंदर चित्रे रेखाटून त्यांना आदरांजली वाहिली आहे. ‘स्टेन्सिल पेपर आर्ट’ च्या वेगळया माध्यमातून तयार केलेल्या या चित्रांची परिसरातील लोकांकडून प्रशंसा होत आहे.  

डाॅ.संदीप डाकवे यांनी आतापर्यंत राजकीय, सामाजिक, चित्रपट क्षेत्रातील अनेक मान्यवर व सेलिब्रिटींची हुबेहुब चित्रे तयार करुन त्यांना भेट दिली आहेत. त्याच्या या गोष्टीची नोंद ‘इंडिया बुक आॅफ रेकाॅर्ड’, ‘हायरेंज बुक आॅफ वल्र्ड रेकाॅर्ड’ या पुस्तकात झाली आहे. सातत्याने वेगळेपण जपत समाजप्रबोधन, जनजागृती यासाठी डाॅ.संदीप यांनी आपल्या कलेचा व लेखणीचा उपयोग केला आहे.  त्यांच्या या कार्याची दखल घेत महाराष्ट्र राज्य शासनाने चारदा तर विविध मंडळे, सामाजिक संस्थांनी त्यांना ‘दर्पण’, ‘आचार्य बाळशास्त्री जांभेकर स्मृती पुरस्कार’, ‘पत्रकार भूषण’, ‘पत्रकार रत्न’,‘कलारत्न’, ‘कलाविभूषण’, ‘कलागौरव’, ‘पाटण भूषण’ अशा सुमारे 36 पेक्षा जास्त पुरस्कारांनी गौरवले आहे.

वडील राजाराम डाकवे व आई सौ.गयाबाई डाकवे हे त्याला सतत प्रोत्साहन देत असतात. शिवसमर्थ समुहाचे शिल्पकार अॅड. जनार्दन बोत्रे, प्राचार्य डाॅ.यशवंत पाटणे, कलाशिक्षक बाळासाहेब कचरे, जयंत कदम, सुरेश जाधव, सौ. रेश्मा डाकवे यांचे त्याला सतत मार्गदर्शन लाभते.

आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीच्या पाश्र्वभूमीवर पत्रकार डाॅ.संदीप डाकवे यांनी ‘स्टेन्सिल पेपर आर्ट’ च्या माध्यमातून साकारलेले चित्र परिसरात कौतुकाचा विषय ठरले आहे. एका पत्रकाराकडून दर्पणकारांना दिलेली ही अनोखी मानवंदनाच म्हणावी लागेल.