वांगव्हॅली पत्रकार संघाचे कार्य कौतुकास्पद- श्रीरंग तांबे







छाया :अनिल देसाई.

वांगव्हॅली पत्रकार संघाच्या कार्यक्रमात कोरोना योद्ध्यांना मार्गदर्शन करताना पाटणचे प्रांताधिकारी श्रीरंग तांबे.

तळमावले/वार्ताहर : 

वांगव्हॅली पत्रकार संघाचे कार्य कौतुकास्पद असून ते समाजासाठी दिशादर्शक आहे असे गौरवोद्गार पाटणचे प्रांताधिकारी श्रीरंग तांबे यांनी काढले ते मराठी पत्रकारितेचे जनक, दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त संघाच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ढेबेवाडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पवार, प्राचार्य डाॅ.अरुण गाडे, श्रीनिवास वाळवेकर, डाॅ.चंद्रकांत बोत्रे, डाॅ.सुभाष ताईगडे, डाॅ. धनंजय कुंभार, डाॅ. अजय सपकाळ, संघाचे संस्थापक चंद्रकांत चव्हाण, संजय लोहार, मंडलाधिकारी प्रवीण शिंदे, आरोग्य कर्मचारी इतर मान्यवर उपस्थित होते.

वांगव्हॅली संघाने आतापर्यंत आपल्या उपक्रमाच्या माध्यमातून समाजमनावर छाप उमटवली आहे. कोरोना काळात अहोरात्र काम केलेल्या योद्यांचा सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, पुस्तक, गुलाबपुष्प देवून संघाच्यावतीने गौरव करण्यात आला. हा स्तुत्य उपक्रम आहे. कोरोना काळात प्रसारमाध्यमांचे देखील योगदान मोलाचे आहे. शासनाच्या ‘माझे कुटूंब, माझी जबाबदारी’ या उपक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे तसेच शासनाच्या माध्यमातून करण्यात येत असलेल्या लसीकरण मोहीमेस सहकार्य करावे असेही आवाहन प्रांताधिकारी श्रीरंग तांबे यांनी याप्रसंगी केले.

सपोनि संतोष पवार म्हणाले, ‘‘वांगव्हॅली पत्रकार संघाचे काम दीपस्तंभासारखे आहे. यापुढेही त्यानी अशा प्रकारचे उपक्रम राबवावेत. कोरोना काळात काम केलेल्या लोकांना सत्कार ही अभिमानाची बाब आहे, अशा गोष्टींमुळे भविष्यात त्यांना काम करण्यास आणखी उर्जा मिळेल. त्यामुळे वांगव्हॅली ने केलेला सत्कार लक्षणीय आहे.’’

याप्रसंगी प्राचार्य डाॅ.अरुण गाडे, चंद्रकांत चव्हाण, संजय लोहार, डाॅ.चंद्रकांत बोत्रे, डाॅ.सुभाष ताईगडे, डाॅ.खबाले यांनी आपली मनोगते व्यक्त केली.

दरम्यान कोरोना योध्दा म्हणून विभागातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी, आरोग्य सेवक, नर्सेेस, पोलीस कर्मचारी, पोलीस पाटील यांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, पुस्तक, गुलाबपुष्प ‘कोरोना योध्दा’ पुरस्काराने विशेष गौरव करण्यात आला.

अध्यक्षीय भाषणात बोलताना श्रीनिवास वाळवेकर म्हणाले, ‘‘कोरोना काळात आरोग्य विभागाने केलेले काम अतिशय मौल्यवान आहे. अशा विविध क्षेत्रात काम केलेल्या लोकांचा गौरव करुन त्यांची पाठ कौतुकाने थोपटण्याचे काम वांगव्हॅली पत्रकार संघाने केले आहे. ऐहिक सुखापेक्षा आरोग्य जास्त महत्त्वाचे आहे हे या महामारीने संपूर्ण जगाला दाखवून दिले आहे. स्वतःचा जीव धोक्यात घालून इतरांसाठी आपले प्राण पणाला लावलेल्या लोकांचा गौरव हा समाजाला दिशादर्शक असाच आहे.’’

श्री वाल्मिकी विद्यामंदीराच्या भव्य आवारात कोरोना योद्यांचा सन्मानाचा कार्यक्रम रंगला. या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन, आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमा पुजनाने झाली. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वांगव्हॅली पत्रकार संघाचे तुषार देशमुख, नितीन बेलागडे, अमोल चव्हाण, प्रमोद पाटील, बाळासाहेब रोडे, हरीष पेंढारकर, पोपट झेंडे, पोपट माने, प्रदीप माने,सुरेश पाटील, छायाचित्रकार अनिल देसाई, विजय सुतार, अमित शिंदे, राजेंद्र पुजारी व अन्य पदाधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डाॅ.संदीप डाकवे, सुुंदर सुत्रसंचालन पी.जी.जंगाणी सर आणि आभार प्रदर्शन प्रमोद पाटील यांनी मानले.

  वृत्तपत्रे वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे काम वृत्तपत्र विक्रेते मोठया निष्ठेने पार पाडतात. काही अपवाद वगळता नेहमीच ते फिल्डवर काम करत असतात. ते समाजापासून नेहमी दुर्लक्षित राहतात. अशा विभागातील सर्व पेपर विक्रेते यांचाही आवर्जून सन्मानपत्र, पुस्तक देवून विशेष गौरव करण्यात आला. 







पाटणचे प्रांताधिकारी श्रीरंग तांबे यांचा सत्कार करताना वांगव्हॅली पत्रकार संघाचे संस्थापक चंद्रकांत चव्हाण व अध्यक्ष संजय लोहार.