सातारा पोलीस विभागाची एक वर्षातली कामगिरी उत्तम ; गुन्ह्याचे प्रमाण झाले कमी - गृहराज्य मंत्री ना.शंभूराज देसाई

 


सातारा दि.19 (जिमाका): पोलीस दलाच्या कर्तव्य दक्षतेमुळे मागील सन 2020 या वर्षात गुन्हयांचे प्रमाण कमी होऊन जिल्ह्यात कायदा व सुव्यस्था नियंत्रणात ठेवण्यात पोलीस विभागाला यश आले आहे, असे गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आज सांगितले.

गृह विभागाची वर्षभराच्या कामकाजाची माहिती देण्यासाठी येथील तालुका पोलीस स्टेशन शेजारील शिवतेज हॉलमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री. देसाई बोलत होते. या पत्रकार परिषदेला अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील उपस्थित होते.

सन 2019 मध्ये गुन्हे शाबीत करण्याचे प्रमाण 35.05 होते तर सन 2020 मध्ये गुन्हे शाबीत करण्याचे प्रमाण वाढले असून ते 58.41 इतके आहे. तसेच गुन्हेगारांवर तडीपारीच्या कारवायादेखील करण्यात आल्या आहेत. राज्य शासनाने पोलीस विभागाला सुविधा देण्यावर भर दिला असून जिल्हा नियोजन समितीतून अडीच कोटी निधी ठेवण्यात आला आहे. या निधीतून 50 लाख सीसीटीव्हीसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. त्याचबरोबर 10 नवीन वाहने खरेदी करणार असल्याचेही गृह राज्यमंत्री श्री. देसाई यांनी यावेळी सांगितले.

येणाऱ्या नवीन अर्थसंकल्पात प्रत्येक पोलीस स्टेशनसाठी एक नवीन वाहन मिळण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे सांगून श्री. देसाई पुढे म्हणाले, तापोळा जवळील 50 ते 52 गावे ही महाबळेश्वर पोलीस स्टेशनला जोडण्यात यावी असा प्रस्ताव होता या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. जिल्ह्यात गुन्ह्यांचे प्रमाण कमी झाल्याबद्दल श्री. देसाई यांनी पोलीस विभागाचे कौतुकही या पत्रकार परिषदेत केले.