येत्या आठवड्यात जुना कोयना पूल हलक्या वाहनांच्या वाहतुकीस खुला होणार - पृथ्वीराज चव्हाण



कराड |कृष्णाकाठ वृत्तसेवा :
१५० वर्षे जुना ब्रिटिशकालीन पूल वाहतुकीसाठी गेली काही वर्षे बंद होता. फक्त दुचाकी वाहनांच्या करीता हा पूल सध्या सुरु आहे. मागील वर्षी अधिकाऱ्यांच्यासोबत चर्चा झाली होती कि जुना कोयना पूल हलक्या वाहनांच्या वाहतुकीसाठी खुला करता येईल का? जेणेकरून कोल्हापूर नाक्यावर होणारी वाहनांची वर्दळ कमी होईल व अपघाताचे प्रमाण कमी होईल. यासाठी बांधकाम विभागाकडून या पुलाची क्षमता तपासली गेली या पुलाचे जे पिलर आहेत त्याची मजबुती तपासली गेली व ते आता काम पूर्ण झालेले आहे. त्याचा रिपोर्ट आला आहे. व या पुलावरून हलकी वाहने जाऊ शकतील याची क्षमता तपासली गेली असल्याने १५० वर्षे जुना ब्रिटिशकालीन पूल हलक्या वाहनांच्या वाहतुकीकरिता खुला करता येईल अशी माहिती राज्याचे माजी मुख्यमंत्री आ पृथ्वीराज चव्हाण यांनी आज पूल पाहणी दरम्यान केली. या पूल पाहणी आधी आ पृथ्वीराज चव्हाण यांनी सार्वजनिक विभाग व पोलीस विभाग यांची मिटिंग शासकीय विश्रामगृह येथे घेतली. यावेळी प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, कराड शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी आर पाटील, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री उत्तुरे, उपअभियंता श्री हुद्दार यांच्यासह मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, कराड शहर नगरसेवक राजेंद्र माने, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, जिल्हा परिषद सदस्य निवासराव थोरात, राहुल चव्हाण, जिल्हा अल्पसंख्यांक अध्यक्ष झाकीर पठाण आदी उपस्थित होते. 





यावेळी माजी मुख्यमंत्री आ पृथ्वीराज चव्हाण म्हणाले कि, जुना कोयना पूल येत्या आठ दिवसात हलक्या वाहनांच्या वाहतुकीसाठी खुला करता येणार आहे. यासाठी पुलाची क्षमता तपासण्यासाठी ज्या चाचण्या गरजेच्या आहेत त्या पूर्ण झालेल्या आहेत व संबंधित विभागाच्या मिळालेल्या अहवालानुसार जुन्या कोयना पुलावरून ३ ते ५ टन क्षमतेची वाहने जाऊ शकतील इतकी क्षमता आहे व यावरून किमान हलक्या वाहनांची ये-जा होऊ शकेल. तसेच मोठी वाहने जाऊ नयेत यासाठी पुलाच्या दोन्ही बाजूला हाईट बॅरीकेट लावली जाणार आहेत. 

हा पूल हलक्या वाहनांसाठी खुला केल्याने कोल्हापूर नाका येथे होणारी वाहनांची वर्दळ कमी होईल तसेच अपघाताचे प्रमाण टाळले जाईल. शहरात येणारी वाहतूक जुन्या कोयना पुलाच्या उपलब्धतेमुळे नागरिकांना सोयीची होणार आहे अशी माहिती आ पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी दिली.