काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री विलासकाका पाटील-उंडाळकर यांचे निधन

 राजकारणातील ध्रुव तारा हरपला


कराड / प्रतिनिधी : माजी सहकार मंत्री विलासकाका पाटील-उंडाळकर यांचे सातारा येथे अल्पशा आजाराने निधन झाले. ते 85 वर्षांचे होते. प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर सातारा येथे उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाल्याने संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. पुरोगामी विचारांचा नेता म्हणून उंडाळकर यांची महाराष्ट्रभर ओळख होती. सलग 35 वर्षे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व त्यांनी केले. त्यांच्या या कार्यकाळात त्यांनी अनेक सहकारी संस्थांची उभारणी केली. 12 वर्षे विविध खात्यांचे मंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिले. सहकार मंत्री म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय काम केले होते. त्यांच्या पार्थिवावर आज कराड तालुक्यातील उंडाळे या गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मूळचे उंडाळे (तालुका कराड) गावचे रहिवासी असलेल्या विलासराव पाटील उंडाळकर यांनी 1967 झाली राजकारणात प्रवेश केला होता. सातारा जिल्हा बँकेत संचालक म्हणून प्रवेश केल्यानंतर गेली पाच दशके ते जिल्हा बँकेवर संचालक म्हणून कार्यरत होते. 1962 साली जिल्हा बँकेत प्रवेश केल्यानंतर जवळपास तेरा वर्ष सक्रिय राजकारणात ते कार्यरत होते. त्यानंतर त्यांनी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात सलग 35 वर्ष त्यांनी राष्ट्रीय काँग्रेसचे प्रतिनिधित्व केले होते. 1999 साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतरही सातारा जिल्ह्यात कराड दक्षिण विधानसभा मतदार संघ काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून विलासराव पाटील-उंडाळकर यांनी अबाधित ठेवला होता. 2014 साली विधानसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विलासराव पाटील-उंडाळकर यांचा पराभव केला होता. त्यावेळी अपक्ष निवडणूक लढवणार या विलासराव पाटील-उंडाळकर यांनी राष्ट्रीय काँग्रेसच्या विचारधारेपासून फारकत न घेता आपली तत्वे विचार आणि निष्ठा कायम ठेवले होती. तीन महिन्यापूर्वी जिल्ह्यात पुन्हा राष्ट्रीय काँग्रेस बळकट करण्यासाठी सर्व मतभेदांना तिलांजली देत विलासराव पाटील उंडाळकर आणि माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण हे जिल्ह्यातील दोन्ही नेते एकत्र आले होते. ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसचे कार्यकर्ते एकदिलाने निवडणूक लढवत असतानाच विलासराव पाटील उंडाळकर यांच्या निधनाने राष्ट्रीय काँग्रेसला जबर धक्का बसला आहे.

विलासकाकांवर दुपारी 3 वाजता उंडाळे येथे अंत्यसंस्कार.

कराड तालुक्यातील उंडाळे येथे आज दुपारी 3 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. सकाळी 9:30 वाजता त्यांचे पार्थिव सातारा येथील निवासस्थानातून कराडला आणण्यात येणार आहे . सकाळी 10:30 वाजता कराड शेती उत्पन्न बाजार समिती येथे अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे . 12:30 वाजता कराड येथून उंडाळेकडे रवाना होणार असून दुपारी 2:00 वाजता उंडाळे येथे अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. दुपारी 3:00 वाजता उंडाळे येथे अंत्यविधी होणार आहे.