मुलीची आजी तारुबाई पाचुपते यांचेकडे रोख रक्कम देताना डाॅ.संदीप डाकवे, सोबत पुंडलिक पाचुपते, सत्यम पाचुपते, पुष्पा पाचुपते, रोहित पाचुपते.
तळमावले|कृष्णाकाठ वृत्तसेवा :
नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी संस्था, ट्रस्ट, सामाजिक कार्यकर्ते असे दिनदर्शिका काढतात. अशीच दिनदर्शिका पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने देखील तयार केली आहे. मात्र या दिनदर्शिकेसाठी मिळालेल्या जाहिरात मुल्यातून सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम करण्यात आले आहे. पाचुपतेवाडी (गुढे) येथील कु.ईशिता अमोल पाचुपते या चिमुरडीच्या शस्त्रक्रियेसाठी पाच हजार रुपये रोख स्वरुपात दिनदर्शिकेला मिळालेल्या जाहिरात मुल्यातून देण्यात आले आहेत. सदर रक्कम मुलीची आजी तारुबाई पाचुपते यांचेकडे सुपुर्द करण्यात आली. यावेळी सत्यम पाचुपते, रोहित पाचुपते, पुंडलीक पाचुपते, पुष्पा पाचुपते व अन्य उपस्थित होते. ईशिताच्या शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदत करण्याचे आवाहन ही यावेळी ट्रस्टच्या माध्यमातून करयात आले आहे.
ग्लेझ आर्ट पेपरवर बहुरंगी छपाई केलेल्या दिनदिर्शिकेत विभागातील यात्रा, उत्सव, महापुरुषांच्या जयंती, दिनविशेष इ.ची माहिती दिली आहे.यामुळे लोकांना आपल्या कामाचे अचूक नियोजन करता येवू शकते. विभागातील नवोदित व्यावसायिक, उद्योजक, मित्र परिवार यांच्या जाहिराती माफक दरात छापल्या आहेत. केवळ सोशल मिडीयावरुन केलेल्या आवाहनाला लोकांनी चांगला प्रतिसाद दिल्यामुळे सदर दिनदर्शिका प्रकाशित करता आली आहे. विशेष म्हणजे दिनदर्शिकेच्या प्रत्येक पानावर व्यसनमुक्तीचा लोगो छापून आपले वेगळेपण जपले आहे.
या जाहिरातीचे प्रकाशन ऊसतोड कामगारांच्या हस्ते ऊसाच्या फडात शिवारामध्ये करुन कामगारांना मान देण्याच्या वेगळी संकल्पना ट्रस्टने यावर्षी राबवली होती. स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट च्या प्रत्येक उपक्रमातून समाजासाठी काही तरी करता यावे हा उद्देश असल्याचे मत संस्थापक अध्यक्ष डाॅ.संदीप डाकवे यांनी व्यक्त केले आहे.
यापूर्वी ट्रस्ट च्या माध्यमातून नाम फाऊंडेशनला 35 हजार, केरळ पुरग्रस्तांना 21 हजार, माजी सैनिक हणमंतराव पाटील यांना 5 हजार, आर्मी वेल्फेअर बॅटल कॅज्युअल्टीजला 5 हजार, मुख्यमंत्री सहाय्यता निधी 4 हजार, मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19 ला 3 हजार, भारत के वीर या खात्यात 1 हजार जमा केले आहेत. विशेष म्हणजे ट्रस्टने हे सर्व उपक्रम लोकसहभागातून राबवले आहेत.
स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टला नावीण्यपूर्ण उपक्रम राबवण्यासाठी उपाध्यक्ष आप्पासोा निवडूंगे, सचिव सौ. रेश्मा डाकवे व इतर पदाधिकारी यांचे विशेष मार्गदर्शन लाभते.
मान्यवर व सेलिब्रिटींकडून दिनदर्शिकेचे कौतुक:
गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई, सामाजिक कार्यकर्त्या सुनिती सु.र., सपोनि संतोष पवार, सुप्रसिध्द गायिका कविता राम, अमेय हिंदळेकर, प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, प्राचार्य डाॅ.अरुण गाडे, श्रीनिवास वाळवेकर या मान्यवरांसह फुलाला सुगंध मातीचा, तुझ्या इश्काचा नाद खुळा, श्रीमंतघरची सुन, सांग तू आहेस ना?, लाडाची लेक ग मी, दख्खनचा राजा-जोतिबा या मालिकांच्या सेटवरील सेलिब्रिटींनी स्पंदन दिनदर्शिकेचे व ट्रस्ट सामाजिक उपक्रमांचे कौतुक केेले आहे.