कोकण व पश्‍चिम महाराष्ट्राला जोडणारा ऐतिहासिक दुवा

 उंडाळे : अनेक घटनाचा साक्षीदार हा तुळसण ओढ्यावरील पूल इतिहास जमा.( छायाचित्र शंकर आंबवडे उंडाळे)

उंडाळे|जगन्नाथ माळी :
कराड, रत्नागिरी राज्यमार्गावरील उंडाळे नजीकचा तुळसण ओढ्यावरील पूल रस्ता रुंदीकरणात नुुकताच पाडण्यात आला. या पाश्र्वभूमीवर या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.आता याठिकाणी नवीन पूल बांधण्यात येणार आहे. पण गेल्या पन्नास वर्षापासून अस्तित्वात असलेल्या कोकण व पश्‍चिम महाराष्ट्राला जोडणारा ऐतिहासिक दुवा याविषयी अनेक घटनांचा साक्षीदार असलेल्या या पूलाविषयीच्या आठवणीना उजाळा मिळत आहे.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर साठच्या दशकात भौतिक साधनसामग्रीची वानवा असताना दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा असणारा हा पूल 1970 साली बांधून पूर्णत्वास गेला. स्वदेशी तंत्रज्ञान वापरून पुलाची निर्मिती केली गेली. या पुलाच्या बांधकामामुळे तत्कालीन महामार्गावर असणारा चढ-उतार कमी झाला व कराड- काले -उंडाळे- कोकरूड मार्गे रत्नागिरी कडे जाणारी वाहतुक सुरळीत होण्यास प्रारंभ झाला.

सार्वजनिक बांधकाम क्षेत्रात कमी तंत्रज्ञान असूनही ही एका खांबावर उभा केलेला हा पूल पाहण्यास त्यावेळी आजूबाजूच्या गावातील लोक आवर्जून पुला शेजारी थांबत असत. गेली काही वर्षे या पुलाचे खूप अप्रूप वाटत होते. नंतर मात्र या राज्यमार्गावर अनेक ठिकाणी पुल झाले.

या पुलाला एक भौगोलिक महत्त्व प्राप्त झालेले आहे. पश्चिम महाराष्ट्रातून पुणे, सांगली, कोल्हापूर सातारा येथून कोकणकडे होणारी वाहतूक हा पूल ओलांडल्यानंतर वळणावळणाची होते. म्हणून कोकणचे द्वार असे देखील या पुलास म्हटले जात होते. तसेच कोकणातून घाट मार्गातून पश्चिम महाराष्ट्राकडे निघाल्यास या पूला नंतर सरळ मार्गे प्रवेश करता येतो.

कराड दक्षिण तालुक्याचा बहुतांश भाग डोंगराळ आहे व बराचसा भाग शहरी आहे. या पुलानंतर सुरू होणारे उंडाळे,येळगाव, येवती खोरे हे डोंगराळ प्रदेश म्हणून ओळखले जाते. डोंगरी भागात प्रवेश करणारा पुल म्हणून देखील यास ओळखले जायचे.

कराड तालुक्यामध्ये उत्पादित होणारा शेतीमाल याच राज्य मार्गावरून कोकणाकडे पाठविला जातो व कोकणातून कोळसा, खनिजे, सिमेंट, पी. व्ही. सी. पाईप. इत्यादी माल कराड रेल्वे स्टेशन कडे याच मार्गाने पाठवण्यात येतो. दळणवळणाच्या दृष्टीने हा पर्यायी राज्यमार्ग अतिशय महत्त्वाचा बनला आहे.

मुंबईतून रत्नागिरी,सिंधुदुर्ग,मालवण कडे होणारी गणपती उत्सवातील वाहतूक याच मार्गातून होत असे. अथवा मुंबई-गोवा महामार्गावर रहदारी वाढल्यास याच पर्यायी मार्गाचा वापर करावा लागतो. कराड रत्नागिरी राज्यमार्ग गणपती उत्सवाच्या कालावधीमध्ये खूप रहदारीचा बनतो त्यामुळे या या मार्गाचे रुंदीकरण सध्या चालू आहे.

येत्या काही दिवसातच हा पूल वर्तमानातून इतिहासात जमा होईल गेल्या चार पिढ्यांच्या दळणवळणाचा साक्षीदार असणारा हा दुवा असणार नाही. असतील ते फक्त अवशेष... त्यानंतर नवीन पूल अस्तित्वात येईलच पण या पुलाच्या आठवणी ही ही या मार्गावरून जाणाऱ्यांच्या सदैव स्मरणात राहतील.