धनंजय मुंडेंना मोठा दिलासा, रेणू शर्माने तक्रार घेतली मागे


मुंबई | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार करणाऱ्या रेणू शर्माने आपली तक्रार मागे घेतली आहे. धनंजय मुंडे आणि माझ्या बहिणीमधील संबंध बिघडले होते. त्यामुळे मानसिक तणावातून मी ही तक्रार केली होती. परंतु मुंडे यांच्याविरोधात केलेल्या तक्रारीचा राजकीय वापर केला जात असल्याचे माझ्या लक्षात आले. त्यामुळे मुंडेंविरोधातील तक्रार मी मागे घेत आहे. माझी बलात्कारासंदर्भात तक्रार नाही, असे रेणू शर्माने तपास अधिकाऱ्यांना दिलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
दरम्यान, धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराची तक्रार करणाऱ्या महिलेने आपली तक्रार मागे घेतल्याची बातमी माझ्या वाचनात आली आहे. या प्रकरणात चर्चा केल्यावर खोलात जाऊन सत्यता पडताळून कारवाई करण्याची भूमिका आम्ही घेतली होती. हे प्रकरण गंभीर होते. पण आमचा निष्कर्ष योग्य ठरला, असे या प्रकरणावर बोलताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज कोल्हापुरात सांगितले. तर खोटी तक्रार देणाऱ्या रेणू शर्मावर कारवाई करावी, अशी मागणी भाजपच्या चित्रा वाघ यांनी केली आहे. 
बॉलीवूडमध्ये काम मिळवून देतो असे सांगून धनंजय मुंडे यांनी आपले लैंगिक शोषण केले, असा गंभीर आरोप गायिका रेणू शर्माने केला होता. सोशल मीडियावर तिने केलेल्या या आरोपामुळे महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले होते. धनंजय मुंडे यामुळे अडचणीत सापडले होते. विरोधी पक्ष भाजपने त्यांच्या राजीनाम्याची मागणी करून आंदोलन केली होती. आपली मोठी बहीण करुणा शर्मासोबतही धनंजय मुंडे यांचे संबंध असल्याचे तिने आरोपात म्हटले होते. मात्र करुणा शर्मासोबत परस्पर संमतीने संबंध असल्याचे धनंजय मुंडे यांनी मान्य केले होते. परंतु रेणू शर्माने केलेल्या बलात्काराच्या आरोपामुळे ते अडचणीत आले होते. दरम्यान, रेणू शर्मा ब्लॅकमेलर असल्याचा आरोप भाजपचे कृष्णा हेगडे आणि मनसेचे संतोष धुरी यांनी केला होता. तेव्हापासून या प्रकरणाला वेगळे वळण लागले होते. ३ दिवसांपूर्वी रेणूच्या वकिलांनी आणि नंतर रेणूने घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांचे हे आरोप फेटाळले होते. मात्र आता तिने घुमजाव करत तक्रार मागे घेतली आहे. याबाबतचे प्रतिज्ञापत्र तिने तपास अधिकाऱ्यांना दिले आहे.