‘दीपस्तंभ’ डाॅक्युमेंटरी पोस्टरचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचेकडून अनावरण.

तळमावले/प्रतिनिधी : 

‘दीपस्तंभ’ या डाॅक्युमेंटरी पोस्टरचे अनावरण गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी केले. पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील अष्टपैलू व्यक्तिमत्त्व डाॅ.संदीप डाकवे यांच्या जीवनावर आधारित ही डाॅक्युमेंटरी आहे. स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने या डाॅक्युमेंटरीची निर्मिती केली आहे. डाॅ.डाकवे यांनी गेले काही वर्षापासून वाढदिनी विधायक उपक्रम राबवले आहेत. यंदाच्या वाढदिनी ना.शंभूराज देसाई यांच्या हस्ते ‘दीपस्तंभ’ डाॅक्युमेंटरी पोस्टरचे अनावरण करुन या उपक्रमातील सातत्य जपले आहे. ‘दीपस्तंभ-द जर्नी आॅफ संदीप डाकवे लाईफ’ यामध्ये डाॅ.संदीप डाकवे यांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण घटना यात मांडल्या आहेत.

यापूर्वी डाॅ.संदीप डाकवे यांनी वाढदिनी मोफत वह्या वाटप, शाळेला शैक्षणिक तक्ते वाटप, अनाथाश्रमात धान्य वाटप, ऊसतोड मजूरांना शाल वाटप, रक्तदान, स्वलिखित पुस्तक प्रकाशन असे नावीण्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत. यंदाच्या वाढदिनी काहीतरी वेगळे करण्याचा निश्चय त्यांनी केला होता. त्या अनुषंगाने त्यांनी डाॅक्युमेंटरी पोस्टरचे अनावरण केले आहे.

डाॅ.संदीप डाकवे यांनी पत्रकारिता, साहित्य, कला, सामाजिक इ. क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे यामुळे महाराष्ट्र राज्य शासनाकडून त्यांना 4 पुरस्कारांनी तर इतर सामाजिक संस्थांनी सुमारे 36 पुरस्कारांनी गौरवले आहे. ‘दीप उजळतो आहे’ या फोटोबायोग्राफी च्या माध्यमातून त्यांनी आपला आतापर्यंतचा जीवनप्रवास यापूर्वी मांडला आहे. तर डाॅक्युमेंटरीमधून व्हिडीओच्या माध्यमातून जीवनातील महत्त्वाचे टप्पे उलघडण्यात येणार आहे. ना.देसाई यांनी संदीप डाकवे यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले आहे. या डाॅक्युमेंटरीची माहिती ना.शंभूराज देसाई यांनी घेतली. त्यांनी डाॅ.संदीप यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. लवकरच ही डाॅक्युमेंटरी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.