महापौर किशोरी पेडणेकर "कृष्णकुंज' वर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे राज ठाकरेंना आमंत्रण

 








  मुंबई  वृत्तसेवा : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर या आज दीर्घ काळानंतर  पहिल्यांदाच "कृष्णकुंज 'वर दाखल झाल्या.२३ जानेवारीला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी दक्षिण मुंबईत पोलीस मुख्यालयसमोर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा बसवण्यात येणार आहे. याच सोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी त्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली .तसेच महापौर पेडणेकर यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेऊन त्यांनाही असेच निमंत्रण दिले.

दक्षिण मुंबईत गेटवे ऑफ इंडिया जवळील रिगल सिनेमा, छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय, महाराष्ट्र पोलीस महासंचालक कार्यालयासमोरील चौकात बाळासाहेबांचा पुतळा उभारला जाणार होता. मात्र ही जागा छोटी असल्याने पुतळ्याची जागा बदलण्यात आली. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी केलेल्या मागणीनुसार हा पुतळा आता दक्षिण मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय आणि नॅशनल गॅलरी ऑफ मॉर्डन आर्टस या इमारतीसमोर डॉ.शामाप्रसाद मुखर्जी चौकातील वाहतूक बेटामध्ये उभारण्यात आला आहे. या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यासाठी तथा निमंत्रण देण्यासाठी त्यांनी राज ठाकरे , देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही त्या भेटणार असल्याचे त्यांनी सांगितले.

“शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या सूचनेनुसार सर्वांना निमंत्रण देत आहे. सर्व पक्षीय नेत्यांना निमंत्रण दिले जात आहे. याच पार्श्वभूमीवर फडणवीस, राज ठाकरे आणि आता शरद पवार यांची भेट घेणार असल्याचे महापौर पेडणेकर म्हणाल्या. पुतळा बसवण्यात थोडा उशीर झाला. अनेक परवानग्या रखडल्या होत्या. आता बाळासाहेबांचे चिरंजीव उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या हातून पुतळ्याचे अनावरण होणार आहे हा योगायोग आहे”, असेही महापौर पेडणेकर म्हणाल्या.