मुंबई / प्रतिनिधी : 'बिग बॉस १४' साठी टॅलेंट मॅनेजर म्हणून काम करणारी पिस्ता धाकड हिचे एका अपघातात निधन झाले आहे. शुक्रवारी संध्याकाळी फिल्म सिटी बाहेर ही घटना घडली. सलमान खानसह 'वीकेंड का वार' या एपिसोडचे चित्रीकरण पूर्ण केल्यानंतर पिस्ता तिच्या एका मैत्रिणीसह अॅक्टिव्हावरून घरी जात होती. सेटवरुन बाहेर येताच त्यांची गाडी घसली, आणि मागून येणारी एक व्हॅनिटी व्हॅन पिस्ताच्या अंगावरुन गेली.त्यातच तिचा मृत्यू झाला.
स्पॉटबॉयने शोशी संबंधित सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, रस्त्यावर अंधार असल्यामुळे हा अपघात घडला. पिस्ताची ऍक्टिवा गाडी एका खड्ड्यात पडली आणि दोघीही गाडीवरुन खाली पडल्या. दुसरी तरूणी उजवीकडे पडली, तर पिस्ता डावीकडे पडली. त्याचवेळी त्यांच्या मागून येणारी व्हॅनिटी व्हॅन पिस्ताच्या अंगावरुन गेली. हा अपघात एवढा भीषण होता की घटनास्थळीच पिस्ताचा मृत्यू झाला.