‘दख्खनचा राजा जोतिबा’ च्या सेटवर शिवसमर्थ दिनदर्शिकेचे प्रकाशनतळमावले/वार्ताहर : 

‘स्टार प्रवाह’ या वाहिनीवरील ‘दख्खनचा राजा-जोतिबा’ या सेटवर शिवसमर्थ दिनदर्शिकचे दिमाखदार प्रकाशन करण्यात आले. सुप्रसिध्द अभिनेते दिग्दर्शक महेश कोठारे यांच्या मार्गदर्शनाखाली माधुरी देसाई पाटकर, अमेय हिंदळेकर, कोठारे व्हीजनची संपूर्ण टीम, ज्योतिबाची भूमिका साकारणारे अभिनेते विशाल निकम, महालक्ष्मीची भूमिका साकारणारी अभिनेत्री निशा परुळेकर, चोपडाई ची भूमिका साकारणारी अभिनेत्री सई कल्याणकर व इतर कलावंत मान्यवर उपस्थित होते.

मराठी परंपरा, मराठी प्रवाह ही नवी टॅगलाईन घेवून स्टार प्रवाह ही वाहिनी सध्या मालिकांचे प्रक्षेपण करत आहे. स्टार प्रवाह ने वेळोवेळी प्रसारित केलेल्या मालिकांचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे. ग्रामीण भागावर या मालिकांचा पगडा असल्याचे दिसून येत आहे. दैनंदिन मालिकांबरोबरच स्टार प्रवाहने देव देवतांच्यावर मालिका बनवून आपला वेगळा ठसा उमटवला आहे. यामध्ये विठू माउली, देवा श्री गणेशा, श्री गुरुदेव दत्त अशा दर्जेदार मालिका बनवून आपला वेगळा प्रेक्षक वर्ग तयार केला आहे. ‘दख्खनचा राजा-जोतिबा’ ही मालिकादेखील लोकांच्या पसंतीस उतरली आहे.

शिवसमर्थ समुहाचे शिल्पकार अॅड.जनार्दन बोत्रे यांच्या कुशल नेतृत्वाखाली संस्थेच्यावतीने माहितीपूर्ण दिनदर्शिका प्रकाशित केली जात आहे. या दिनदर्शिकेच्या मुखपृष्ठावर प्रत्येक वर्षी एका देवदेवतांचे चित्र छापले जाते. यावर्षी कुलदैवत श्री ज्योतिबा यांचे चित्र छापले होते. त्यामुळे या दिनदर्षिकेचे प्रकाशन ‘दख्खनचा राजा जोतिबा’ या मालिकेच्या सेटवर करण्यात यावे असे ठरवण्यात आले होते. त्या अनुषंगाने सदर प्रकाशन करण्यात आले.

या प्रकाशनप्रसंगी संस्थेच्यावतीने संतोष देसाई, संदीप डाकवे, रणजितसिंह निंबाळकर, महेश जाधव, विजय मोहीते, छायाचित्रकार अनिल देसाई व इतर पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, शिवसमर्थ च्या वतीने राबवण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचे कलावंतांनी कौतुक केले.