शिक्षण व सहकार क्षेत्रातील प्रगल्भ अभ्यासक, उत्कृष्ट मार्गदर्शक हरपला .

शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांची काकांना श्रद्धांजली.



उंडाळे / प्रतिनिधी :  महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या निधनाने शैक्षणिक व सहकार क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून आपण उत्कृष्ट मार्गदर्शकाला मुकलो असल्याची भावना. आज येथे अनेक वक्त्यांनी व्यक्त केली.         

येथील स्वातंत्र्यवीर दादासाहेब उंडाळकर विद्यालयात, ग्रामीण विकास शिक्षण संस्था व स्वातंत्र्यसैनिक शामराव पाटील पतसंस्था यांच्यावतीने शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध मान्यवरांनी शब्द सुमनांजली अर्पण केली.  

ग्रामीण विकास शिक्षण संस्थेचे निरीक्षक प्राचार्य डॉ. आर. ए. कुंभार म्हणाले, काकांनी शैक्षणिक क्षेत्रात महात्मा फुले, राजश्री शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व कर्मवीर भाऊराव पाटलांचा वारसा जोपासला. शिक्षकांना चांगले वक्ते ऐकायला मिळावेत यासाठी राष्ट्रीय नेत्यांपासून विविध क्षेत्रातील मान्यवर उंडाळे भूमीत आणून त्यांचे विचार सर्वांच्या पर्यंत पोचवले. ग्रामीण डोंगरी भागातील विद्यार्थ्यांना नवनवीन ज्ञान मिळाले पाहिजे व तो घडला पाहिजे यासाठी त्यांनी अखेरपर्यंत प्रयत्न केले. शिक्षकांनी त्याच तळमळीने ह्या विद्यार्थ्यांना ज्ञान देऊन विद्यार्थ्यांना घडवावे. हीच काकांना श्रद्धांजली आहे. 

स्वातंत्र्यसैनिक शामराव पाटील पतसंस्थेचे अध्यक्ष बळवंत पाटील म्हणाले, सर्वसामान्य गोरगरीब जनतेची आर्थिक गरज भागावी त्याची उन्नती व्हावी म्हणून 1981 साली शामराव पाटील पतसंस्थेची स्थापना केली. सामान्य  तरूणांना तिथे काम करण्याची संधी देऊन या संस्थेचे वटवृक्षात रूपांतर केले. सर्वसामान्यांचे आर्थिक उन्नति करण्याचे काकांचे स्वप्न पूर्ण करण्याचा संकल्प करुया.            

ग्रामीण विकास शिक्षण संस्थेचे निरीक्षक व्ही. के शेवाळे म्हणाले, जलक्रांती च्या माध्यमातून डोंगरी भागातील शेतकऱ्यांच्या कुटुंबाचे परिवर्तन घडवण्याचे महान कार्य काकांनी केले. उंडाळे ही स्वातंत्र्य सैनिकाची पंढरी म्हणून उदयास आणली. त्यांचे विचार समाजात रुजवून त्यांच्या कुटुंबीयांची बांधिलकी ठेवूया हीच त्यांना आदरांजली ठरेल.      

स्वातंत्र्यवीर दादासाहेब उंडाळकर विद्यालयाचे प्राचार्य बी. पी. मिरजकर म्हणाले, काकांच्या निधनाने शिक्षण संस्था पतसंस्था यासह आपल्या सर्वांचा कुटुंब प्रमुख आधार हरवला आहे. डोंगरी भागातील विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचे शिक्षण मिळावे हा त्यांचा अट्टाहास होता. स्पर्धा परीक्षेत ग्रामीण भागातील विद्यार्थी चमकत आहेत त्यांचे श्रेय काकांना जाते. ग्रामीण भागाची आर्थिक, शैक्षणिक उन्नती करण्याची त्यांची तळमळ आपण सर्वांनी जोपासूया. 

निनाईदेवी विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक कोठावळे म्हणाले, आपल्या कुटुंबातील कर्ता माणूस गेल्याची भावना निर्माण झाली आहे. अनेक कार्यकर्त्यांना घडविण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. त्यांनी माझ्यासारख्या सामान्य शिक्षकाला राष्ट्रपतीच्या व्यासपीठावर बोलण्याची संधी दिली. आजवर केलेल्या कार्यक्रमातील विचार जतन करून ठेवून भावी पिढीला प्रबोधन करण्याची त्यांची भूमिका समाजाप्रती असणारा जिव्हाळा दर्शवते त्यांच्या कार्याला सलाम.                             

निरीक्षक एम बी पाटील म्हणाले स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनंतर अनेक बिरुदावली मिळणारे एकमेव नेते काका आहेत. प्रशासनावर मजबूत पकड असणारा नेता ही त्यांची ओळख होती. अनेक सहकारी संस्था काढल्या जोपासल्या, वाढवल्या त्यांच्या स्वातंत्र्यसैनिक अधिवेशन, समाज प्रबोधन साहित्य संमेलनामुळे परिसरातील लोकांची वैचारिक पातळी उंचावली. अशा अष्टपैलू नेत्याला विनम्र अभिवादन.         

यावेळी भीमराव जाधव, दिलीपराव पाटील, आनंदराव जानुगडे, पी. टी. पाटील, प्रा. सौ. पाटील आदींनी श्रद्धांजली अर्पण केली. शंकर आंबवडे यांनी सूत्रसंचालन करून उपस्थितांचे आभार मानले.