कोंबड्या घेऊन जाणारा टेम्पो उलटला .

 कोंबड्या पकडून नेण्यासाठी ग्रामस्थांची एकच झुंबड .
ढेबेवाडी / प्रतिनिधी :

कराड-ढेबेवाडी मार्गावर काढणे फाट्यानजीक मध्यरात्रीच्या सुमारास कोंबड्यांची वाहतूक करणारा टेम्पो उलटल्याने एक अपघात घडला. टेम्पोमध्ये असलेल्या काही कोंबड्या अपघातात मरण पावल्या तर काही धक्क्याने वाहनातून बाहेर फेकल्या गेल्या. अशा वेळी कोंबड्या पकडून घरी नेण्यासाठी ग्रामस्थांची एकच झुंबड उडाल्याचं दिसून आलं.

कराड-ढेबेवाडी मार्गावर काढणे फाटा आहे. या ठिकाणी मध्यरात्रीच्या सुमारास कोंबड्यांची वाहतूक करणारा टेम्पो उलटला. टेम्पोत असणाऱ्या शेकडो कोंबड्या मृत्युमुखी पडल्या. तर काही कोंबड्या टेम्पोतून फेकल्या गेल्याने विखुरल्या गेल्या व जखमी झाल्या. टेम्पो चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले. अपघात झाल्याचे समजताच सकाळच्या सुमारास अनेक वाहनचालक, स्थानिक लोकांनी अपघातस्थळी येऊन जखमी व मृत्युमुखी पडलेल्या कोंबड्या पळवल्याचा प्रकार घडला. या अपघातात नेमक्या किती कोंबड्या मृत्युमुखी पडल्या किंवा चोरीला गेल्या ते कळू शकलेले नाही. संबंधित व्यक्तीचा नक्की किती रुपयांचा तोटा झाला, याची माहितीही मिळू शकलेली नाही. या अपघाताचा पोलीस तपास सुरु आहे.