कराड जनता सहकारी बँकेचा बँकिंग परवाना रिझर्व्ह बँकेने केला रद्द : ठेवीदार सभासदामध्ये खळबळ.

 





कराड / प्रतिनिधी :

सहकार क्षेत्रात नावाजलेली कराड जनता सहकारी बँकेचा बँकिंग परवाना रिझर्व्ह बँकेने रद्द केला आहे. याबाबतचे आदेश आज येथे प्राप्त झाल्याने ठेवीदार, सभासदामध्ये खळबळ उडाली आहे.

रिझर्व्ह बँकेने परवाना रद्द केल्यानंतर सहकार आयुक्तांनी बँकेची दिवाळखोरी जाहीर करत बँक अवसायनत गेल्याचे जाहीर केले आहे. बँकेवर उपनिबंधक मनोहर माळी यांची अवसायानिक म्हणून नियुक्तीही करण्यात आली आहे. बँकेच्या सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबई येथे 29 शाखा व 32 हजार सभासद आहेत.

उपनिबंधक मनोहर माळी यांनीही या माहितीला दुजोरा दिला आहे. कराड जनता सहकारी बँकेचा बँकिंग परवाना रिझर्व्ह बँकेने रद्द केला आहे.आदेश रात्री उशिरा पारीत झाले आहेत. याबाबत बँकेतही त्याची स्थळप्रत लावण्यात आली आहे.

रिझर्व्ह बँकेने दिलेल्या आदेशानुसार बँकेत 5 लाखाआतील ठेवीदारांचे पैसे परत केले जाणार आहेत. याला किमान तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. बँकेच्या दोन विस्तारीत कक्षासह 29 शाखा आहेत. सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबई येथे संस्था विस्तारलेल्या आहेत. सर्व शाखांचे कामकाज बंद राहणार आहे. रिझर्व्ह बँकेने परवाना रद्द केल्यानंतर आता सहकार आयुक्तींनी कराड जनता बँक अवसायानात गेल्याचे जाहीर केले आहे.

कराड जनता बँकेवर नोव्हेंबर 2017 मध्ये रिझर्व्ह बँकेचे निर्बंध आले. यानंतर 6 आॅगस्ट 2019 रोजी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नेमणूक झाली. यानंतरच्या कालावधीत संचालक मंडळाच्या अनेक गोष्टी बाहेर आल्या. निर्बंधाच्या कालवधीतच बँकेचे सभासद आर. जी. पाटील यांनी न्यायालयात दाखल केलेल्या तक्रारीवर पोलिस तपासाचे आदेश झाले.

कराड शहर पोलिसात जनता बँकेच्या संचालक मंडळासह काही अधिकाऱ्यांवर तब्बल 310 कोटींच्या अपहाराचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. 2017 ते 2019 या निर्बंधाच्या काळात बँकेने केलेले काम नियमबाह्य होती. रिझर्व्ह बँकेच्या लक्षात आल्यानंतर बँकेचा बँकिंग परवानाच रद्दचा आदेश दिला आहे.