ऊसगाळप आणि ऊस पेमेंट मध्ये श्रीरामची आघाडी

 

फलटण/प्रतिनिधी : श्रीराम जवाहर शेतकरी सहकारी साखर उद्योगाने (श्रीराम सहकारी साखर कारखाना) ऑक्टोबर महिन्यात केलेल्या गाळपाचे १ कोटी ५७ लाख ५ हजार ५४३ रुपये, त्यानंतर दि. १ ते १५ नोव्हेंबर दरम्यान केलेल्या गाळपाचे १० कोटी ३९ लाख ८४ हजार ५८४ रुपयांचे पेमेंट ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात यापूर्वीच जमा केले असून दि. १६ ते ३० नोव्हेंबर दरम्यान गाळपास आलेल्या ऊसाचे पेमेंट निर्धारित वेळेवर ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार असल्याचे श्रीरामचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे यांनी सांगितले आहे.

श्रीराम सहकारी साखर कारखाना चालविणाऱ्या श्रीराम जवाहर शेतकरी सहकारी साखर उद्योगाने यावर्षीच्या हंगामात आतापर्यंत १ लाख ३ हजार ३७६ मे. टन ऊसाचे गाळप केले असून १ लाख ८ हजार ९५० क्विंटल साखर उत्पादन केले आहे. सरासरी साखर उतारा १०.७१ % मिळाल्याचे डॉ. बाळासाहेब शेंडे यांनी सांगितले.

दि. १ ते १५ नोव्हेंबर दरम्यान ४० हजार ११६ मे. टन ऊसाचे गाळप करण्यात आले असून एफ. आर. पी. २५९२.१० रुपये प्रति टन प्रमाणे या संपूर्ण ऊसाचे १० कोटी ३९ लाख ८४ हजार ५८४ रुपये ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर दि. २७ नोव्हेंबर रोजी वर्ग करण्यात आल्याचे डॉ. बाळासाहेब शेंडे यांनी सांगितले. यावेळी श्रीरामचे कार्यकारी संचालक चंद्रकांत तळेकर, श्रीराम जवाहरचे प्रोजेक्ट मॅनेजर मानसिंग पाटील उपस्थित होते.