कोयना शिक्षण संस्थेने ज्ञानरुपी दिव्याने अज्ञानरुपी अंधःकार दूर केला : रामचंद्र जाधव
पाटण/प्रतिनिधी : ज्ञान दीपेन भास्वता हे ब्रीदवाक्य घेऊन पाटण सारख्या दुर्गम ,डोंगराळ ,दरयाखोरयांनी व्याप्त भुकंपप्रवण व शिक्षणापासुन वंचित असणाऱ्या भागामध्ये कोयना शिक्षण संस्थेने ज्ञानगंगा घरोघरी पोहचवण्याचे कार्य केले .गेली ५२वर्षे पाटण तालुक्यातील जनतेचे जीवनमान उंचवणारी संस्था सातारा जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील एक अग्रगण्य,उपक्रमशील,उच्च गुणवत्ताधारक संस्था म्हणून नावारूपास आली.आज २१व्या शतकातील विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात संस्थेच्या हजारो विद्यार्थ्यांनी समाजात आपल्या कार्यकतृत्वाचा ठसा उमटला आहे .उच्च गुणवत्ता असणारा सुजाण नागरिक घडविण्यामध्ये संस्थेने मोलाचा वाटा उचलला आहे .कोयना शिक्षण संस्थेने ज्ञानरुपी दिव्याने समाजातील अज्ञानरुपी अंधःकार दुर केला.असे प्रतिपादन चोपडी गावचे रहिवाशी व मुंबई येथील पाटण तालुका विकास प्रतिष्ठानचे संचालक रामचंद्र जाधव यांनी केले .न्यू इंग्लिश स्कूल बेलवडे खुर्द विद्यालयात कोयना शिक्षण संस्थेच्या ५३व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते .अध्यक्षस्थानी संस्थेचे सदस्य दादासाहेब जाधव उपस्थित होते .प्रा.सुभाष जाधव,विजया नांगरे यांची प्रमुख उपस्थिती होती .
दादासाहेब जाधव म्हणाले विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातच आपले ध्येय निश्चित करावे .आपली आवड क्षमता ओळखून भविष्यात करियरची निवड करावी .विद्यार्थ्यांनी परीक्षार्थी न बनता ज्ञानार्थी बनावे.मोठी स्वप्ने पहावीत.व ती साकारण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी .

यावेळी डिजीटल क्लासरुमसाठी स्मार्ट टी.व्ही.च्या रकमेचा धनादेश प्र.मुख्याध्यापक अनिल मोहिते यांच्याकडे सुपूर्त करुन रामचंद्र जाधव यांनी सामाजिक बांधिलकी जोपासली.

यावेळी प्रा.सुभाष जाधव ,विजया नांगरे यांनी मनोगते व्यक्त केली .स्वागत प्र.मुख्याध्यापक अनिल मोहिते यांनी केले .प्रास्तविक विठ्ठल डामसे यांनी केले .आभार जागृती कासार यांनी मानले.सुत्रसंचालन शंकर सुतार यांनी मानले.