पुणे पदवीधरमध्ये महाविकास आघाडीचे अरुण लाड यांचा दणदणीत विजय, विजयानंतर म्हणाले...

 






पुणे / प्रतिनिधी : पुणे पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या अरुण लाड यांनी पहिल्या फेरीत विजयासाठी आवश्यक असलेली मते मिळवली आहेत. महाविकास आघाडीचे अरुण लाड यांना 1 लाख 22 हजार 145 मते, भाजपचे संग्राम देशमुख यांना पहिल्या पसंतीची 73321 मतं मिळाली आहेत. तब्बल 48 हजार 824 मतांनी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस महाविकास आघाडीचे राष्ट्रवादीचे उमेदवार अरुण लाड यांनी पहिल्या फेरीतच दणदणीत विजय मिळवला आहे. विजयानंतर अरुण लाड हे सकाळी नऊ वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटण्यासाठी त्यांच्या मोदीबागेतील निवासस्थानी जाणार आहेत.

विजयानंतर अरुण लाड म्हणाले की, क्रांती अग्रणी जी. डी. लाड यांची आज जयंती आहे. त्यांच्या जयंती दिवशी हा विजय मिळाला आहे. चंद्रकांत पाटील यांनी माझा विजय सोपा केला. त्यांनी पदवीधरांसाठी काही कामच केलं नाही. त्यामुळे पदवीधरांनी मला कौल दिला. कॉंग्रेस आणि शिवसेनेची मदत झाली त्यामुळं विजय मोठा झाला, अशी प्रतिक्रिया लाड यांनी दिली.


पुणे विभागातील शिक्षक मतदारसंघात काँग्रेसचे जयंत आसगावकर आघाडीवर

पुणे विभागातील शिक्षक मतदारसंघातील मतमोजणी ही बाद फेरीपर्यंत पोहोचली असून काँग्रेसचे जयंत आसगावकर हे आघाडीवर आहेत. विसाव्या बाद फेरी अखेर जयंत आंसगावकर यांना 17 हजार 117 इतकी मते मिळालेली आहेत तर अपक्ष उमेदवार आणि विद्यमान आमदार दत्तात्रय सावंत यांना 11 हजार 161 इतकी मते मिळाली आहेत. भाजपचे उमेदवार जितेंद्र पवार इथे तिसऱ्या क्रमांकावरती आहेत. त्यांना पाच हजार 878 इतकी मतं मिळालेली आहेत. अद्याप मतमोजणी सुरू आहे.