ऊसाचा कोयता हातात धरलेल्यांनी केले दिनदर्शिकेचे प्रकाशन

 


तळमावले/वार्ताहर :

सकाळच्या बोचरी थंडीपासून हातातील कोयता आणि ऊस यात चाललेली लढाई, त्यातून सपासप येणारे आवाज, काम लवकर पूर्ण करण्याचा इरादा, उन्हाने कोमेजलेले चेहरे, न्याहारीच्या वेळी थोडीशी घेतलेली विश्रांती. अशा क्षणी त्यांना नवीन वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करायला सांगितल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर फुललेले अभिमानाचे हसू आणि डोळयातून आलेले आनंदाश्रू..! हे घडले स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्या दिनदर्शिकेच्या प्रकाशनावेळी...

त्याचे असे झाले पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने यंदा नवीन माहितीपूर्ण दिनदर्शिका तयार करण्यात आली होती. या दिनदर्शिकचे प्रकाशन ‘हटके’ करण्याचा निश्चय स्पंदन परिवाराने केला. आणि या संकल्पनेतून कुंभारगांव -कळंत्रेवाडी येथील मळीच्या शिवारात ऊसाच्या फडात दिनदर्शिकेचे अनोखे प्रकाशन केले. या अभूतपूर्व प्रसंगामुळे कष्टकरी ऊसमजूर भारावून गेले. सकाळपासून केलेल्या कष्टाचा त्यांना क्षणात विसर पडला आणि त्यांच्या डोळयातून आनंदाश्रू आले.

ऊसतोड करताना जीवतोड मेहनत करणारे, उन्हाने रापलेले चेहरे, कष्टाने घटलेले हात नेहमी दुर्लक्षित राहतात. त्यांना मानसन्मान देण्यासाठी, त्यांच्या कष्टाला सलाम करण्यासाठी हा आगळावेगळा प्रकाशन सोहळा केला असल्याचे ट्रस्टचे अध्यक्ष डाॅ.संदीप डाकवे यांनी सांगितले.

या अनोख्या प्रकाशनप्रसंगी जितेंद्र लोंढे, नवनाथ लोंढे, संजू लोंढे, लताबाई लोंढे, विजय लोंढे, विजय साळुंखे, ट्रस्टचे अध्यक्ष डाॅ.संदीप डाकवे, दैनिक लोकमतचे पत्रकार पोपट माने, सा.कुमजाई पर्व चे संपादक प्रदीप माने व अन्य मान्यवर उपस्थित होते. ऊसाच्या फडातील प्रकाशनामुळे फडातील वातावरण काही काळ चैतन्याने भारावून गेले.

विशेष म्हणजे या दिनदर्शिकेला मिळालेल्या जाहिरातीतून काही रक्कम सामाजिक बांधिलकी म्हणून गरजू रुग्णाला देण्यात येणार आहे. नवीन वर्षानिमित्त सर्वजण दिनदर्शिका करतात. परंतू दिनदर्शिकेतून गरजूंना मदत हे वेगळेपण नेहमीप्रमाणे स्पंदन ट्रस्ट ने जपले आहे.

सायेब आमचा पण फुटू पेपरात छापा:

‘‘सायेब, वाइच आधी आला असता तर आमी काम करतानाचा फुटू तरी काढला असतासा, आणि त्यो पेपरात छापला असता.’’ अशी एक बोलकी प्रतिक्रिया महिला मजूराने व्यक्त केली होती. आपल्या हस्ते नवीन दिनदर्शिकेचे प्रकाशन करुन तो फोटो पेपरात छापून येणार आहे, असे त्यांना कळल्यावर त्यांचे चेहरे आनंदाने हरखून गेले.