महाविकासआघाडी फुल्ल जोशात; पुण्यात निकालापूर्वीच झळकले अरुण लाड यांच्या विजयाचे बॅनर्स

 

पुण्यात महाविकास आघाडी भाजपला धक्का देणार? राष्ट्रवादी काँग्रेसचे अरूण लाड यांची भक्कम आघाडी

पुणे: पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतील सर्वात लक्षवेधी लढत म्हणून सगळ्यांचे लक्ष असलेल्या पुण्यात सुरुवातीच्या टप्प्यात महाविकास आघाडीची सरशी होताना दिसत आहे. काहीवेळापूर्वीच याठिकाणी मतमोजणीला सुरुवात झाली होती. आतापर्यंत 65 ते 70 हजार मतांची छाननी झाली आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अरूण लाड हे भाजपच्या संग्राम देशमुख यांच्यापेक्षा 10 हजार मतांनी पुढे आहेत.

तर पुणे शिक्षक मतदारसंघातही महाविकासआघाडीने भाजपला मागे टाकले आहे. याठिकाणी काँग्रेसचे जयंत आसगावकर यांनीही भक्कम आघाडी घेतली आहेत. भाजपच्या दत्तात्रय सावंत यांच्यापेक्षा ते चार हजार मतांनी पुढे आहेत. याठिकाणी आतापर्यंत साधारण 36 हजार मतांची छाननी झाली आहे. जाणकरांच्या मते हाच ट्रेंड आता कायम राहू शकतो. तसे झाल्यास महाविकासआघाडीला भाजपच्या बालेकिल्ल्यात मोठे यश मिळू शकते.

आज सकाळी धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पोटनिवडणुकीत भाजपचे अमरीश पटेल यांनी दणदणीत विजय मिळवला होता. त्यामुळे आज सकाळपासून भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे. मात्र, महाविकासआघाडीच्या नेत्यांनी इतर पाच जागांवर आपला विजय होईल, असा दावा केला आहे.

महाविकासआघाडी फुल्ल जोशात; पुण्यात निकालापूर्वीच झळकले अरुण लाड यांच्या विजयाचे बॅनर्स

पुण्यात महाविकासआघाडीच्या नेत्यांना आपल्या विजयाची खूपच खात्री आहे. पुण्यातील सारसबाग चौकात पर्वती मतदारसंघाचे राष्ट्रवादी युवक अध्यक्ष अमोल ननावरे यांनी आज दुपारीच अरूण लाड यांच्या विजयाचे बॅनर्स लावले. पुण्यातील निकाल येण्यास जवळपास 40 तास लागतील असा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला. मात्र, त्याआधी राष्ट्रवादीने अरुण लाड यांच्या विजयाचे बॅनर लावले आहेत. या बॅनरची शहरात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.