‘‘काळे काका तुम्ही खरे हिरो आहात’’,


‘‘काळे काका तुम्ही खरे हिरो आहात’’,

वरील उद्गार आहेत सुप्रसिध्द अभिनेते जगन्नाथ निवंगुणे यांचे......
दि शिवसमर्थ मल्टीस्टेट सोसायटीच्या सणबूर येथील एका कार्यक्रमासाठी सुप्रसिध्द अभिनेते जगन्नाथ निवंगुणे आले होते. कार्यक्रम संपल्यानंतर मी काळे काकांची ओळख करुन दिली. त्यावेळी ते काळे काकांना म्हणाले, ‘‘आम्ही तर पडद्यावरील हिरो आहोत, स्क्रिप्ट नुसार काम करतो, परंतू आपण अनेकांचे जीव अॅम्ब्युलन्सच्या माध्यामातून वाचवण्याचे काम करता, त्यामुळे काळे काका तुम्ही खरे हिरो आहात, मला तुमच्या आणि तुमच्या अॅब्युलन्स सोबत फोटो काढायचा आहे. असे म्हणून त्यानी फोटो काढला.’’ काळे काकांच्या कार्याला मिळालेली ही सर्वात मोठी दाद आहे असे मला वाटते.

चेहरा नेहमी स्मित हास्य असलेला, हाफ शर्ट, खांद्यावर टर्कीशचा छोटा टाॅवेल, रुबाबदार चालणे, बिनदास्त बोलणे असे व्यक्तिमत्त्व असणारी व्यक्ती म्हणजे प्रकाश प्रल्हाद काळे. सर्वजण त्यांना प्रेमाने ‘काळे काका’, ‘बटू आप्पा’ म्हणायचे. काही काळ त्यांनी वडाप लाईनला काम केले. वडाप लाईनला काम करत असताना एक ‘प्रामाणिक ड्रायव्हर’ म्हणून आजही सर्वजण त्यांचा आवर्जून उल्लेख करतात.
शिवसमर्थ परिवाराचे शिल्पकार अॅड. जनार्दन बोत्रेसाहेब यांनी विविध मान्यवरांच्या हस्ते रविवार 29 डिसेंबर, 2013 रोजी शिवसमर्थ अॅम्ब्युलन्सचे लोकार्पण केले. साहेबांच्या मार्गदर्शनानुसार 1 जानेवारी 2014 पासून काळे काकांनी ‘शिवसमर्थ’ च्या अॅम्ब्युलन्सवर काम करण्याची जबाबदारी स्वीकारली व ती अखंडपणे चोख पार पाडली.  विभागातील सर्व डोंगर वाडी वस्त्यांवर अॅम्ब्युलन्स म्हटले की काकांचे नाव पुढे यायचे. रात्री अपरात्री केव्हाही फोन आला तरी ते कंटाळत नसत. उत्साहाने ते हे काम करत असायचे. कित्येक पेशंटचा जीव त्यांनी वाचवला आहे. कित्येक पेशंटना कर्नाटकमधील नागरमुनोळी या ठिकाणी नेणे, त्यांना त्या ठिकाणी योग्य सेवा दिली जात आहे का नाही? याची विचारपूस ते नेहमी करत असत.

कोरोना काळात देखील त्यांनी आपले काम प्रामाणिकपणे करण्याचा नेहमी प्रयत्न केला. अगदी सणबूरचा पहिला कोरोनाचा पेशंट दवाखान्यात पोहोचवण्यात ते
आघाडीवर होते. काही दिवसांनी त्यांना शासकीय नियमानुसार पाटण येथे काॅरन्टाईन व्हावे लागले होते. त्यानंतर ते पुन्हा अॅम्ब्युलन्स वर रुजू झाले होते. अॅम्ब्युलन्स मध्ये त्यांनी छोटा गगनगिरी महाराजांचा फोटो ठेवला होता. त्याची ते नित्यनेमाने पुजा करत असत. त्या छोटया फोटोला हार, गजरा नियमित आणत असत.
हसरा चेहरा असलेल्या व्यक्तिमत्त्वाची प्राणज्योत काल दुपारी 22 डिसेंबर रोजी आकस्मित मालवली. संपूर्ण मानवजातीला स्वच्छतेचा संदेश देणारे राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी दिवशीच त्यांना अखेरचा श्वास घ्यावा लागला हे भाग्य म्हणावे की दुर्देव हेच समजेनासे झाले आहे.

अनेक लोकांच्या जीवनात शिवसमर्थ अॅम्ब्युलन्सच्या माध्यमातून जीवनाचा ‘प्रकाश’ फुलवणारे ‘काळे काकांची’ अकाली ‘एक्झिट’ दुःखदायक अशीच आहे. त्यांच्या आकस्मिक जाण्याने काळे परिवारावर मोठा डोंगर कोसळला आहे. काळे कुटूंबियांना या दुःखातून सावरण्याची ईश्वराने शक्ती देवो हीच प्रार्थना...
काळे काकांना शिवसमर्थ परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रध्दांजली..!


शब्दांकन: डाॅ.संदीप डाकवे, मो. 97640 61633