ढेबेवाडी बस स्थानक चोरट्यांच्या रडारवर

ढेबेवाडी / प्रतिनिधी :

यापूर्वी मोटरसायकल मधून पेट्रोल चोरले,आरसा लंपास केला अशा घटना अधे मधे कानावर येत असत पण आता या भुरट्या चोरांनी बस स्थानकांतील मुक्कामी बस मधल्या डिझेलवर डल्ला मारण्याची शक्कल लढवली आहे. मात्र बसच्या सावध चालक व वाहकांच्या सावधानतेने चोरट्यांचा हा डाव फसल्याचे समोर आले आहे.

      याबाबतचे सविस्तर वृत्त असे की अनंत अडचणी आणि सुविधांची वाणवा असलेल्या ढेबेवाडी बसस्थानकात आणि स्थानकाच्या परिसरात विजेची सोय नाही, सी.सी.टीव्ही वा सुरक्षेच्या नावाने तर सगळी बोंबच आहे. स्थानकाच्या परिसराला झाडाझुडपांनी व उंच गवताने वेढले आहे,स्थानकात मुतारीची सोय आहे पण अपुरी आहे.त्यामुळे प्रवासी मुतारीच्या बाहेरच आपला विधीचा कार्यक्रम उरकतात त्यामुळे सर्वत्र घाणीचे व दुर्गंधीचे साम्राज्य पसरलेलेआहे बसस्थानकात प्रवेश केला तरच आत काय चाललेआहे हे कळते.

      पण स्थानक असुरक्षित आहे. असुरक्षित आणि असुविधायुक्त बस स्थानकांत कराड,पाटण,वा बाहेरच्या आगारातील गाड्या मुक्कामीअसतात आणि त्यांचे चालक वाहक या अडचणीचा सामना करीत बसमध्येच मुक्काम करतात, अशाच बसमधील डिझेल चोरण्याचा कार्यक्रम सुरू असतानाच बसमधील चालक व वाहकांना जाग आली आणि ते चोरट्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी काढलेल्या डिझेलचे कँन,पाईप सगळे जाग्यावरच सोडून धुम ठोकून गायब झाले.

                      या विभागात प्रवासी वाहतूक करणाऱ्या 20 पेक्षा जास्त लक्झरी बसेस आहेत अशा लक्झरी मधूनही डिझेल चोरीच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. पुणे-मुंबई वा परगांवी असलेल्या कुटुंबांच्या बंद घराच्या परिसरात असलेले सिलींडर,पाण्याचे बंब,उघड्यावर पडलेली भांडी वेळ प्रसंगी बंद घरे फोडून आतील किमती वस्तू चोरल्याच्या घटना घडतात,मात्र बसस्थानकातील उभ्या बसमधून डिझेल चोरीचे अजब प्रकार आता घडू लागले आहेत आणि याला सर्वस्वी एस.टी महामंडळाचे बेजबाबदार अधिकारीच आहेत अशी चर्चा सध्या सुरू आहे आणि सुरक्षेच्या उपाययोजना करा अशी मागणी होत आहे.