कुंभारगावात महाविकास आघाडीची गणिते जुळणार का? संपूर्ण तालुक्याचे लक्ष

कुंभारगाव ग्रामपंचायत बिनविरोध की लढत ?

कुंभारगाव | राजेंद्र पुजारी : ढेबेवाडी विभागातील कुंभारगाव ग्रामपंचायत 11 सदस्य असणारी मोठी ग्रामपंचायत आहे . लक्ष्मी वार्ड,मरीआई वार्ड, नाईकबा वार्ड , श्रीराम वार्ड असे चार वार्ड असून येत्या दि.23 ते 30 डिसेंबर नामनिर्देशन पत्र करण्याचा कालावधी, निवडणूक लढवणाऱ्या  उमेदवाराची यादी दि.4 जानेवारीला प्रसिद्ध होणार असून दि.15 जानेवारी रोजी मतदान व दि. 18 जानेवारीला मतमोजणी व निकाल जाहीर होणार आहे.     

      कुंभारगाव ता पाटण हे राजकीय दृष्ट्या संवेदनशील गांव असून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे मूळगांव असल्याने कुंभारगावला अनन्य महत्व प्राप्त झाले आहे. कुंभारगाव मध्ये, कॉग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी असे तीन गटाचे प्राबल्य असून गेली 5 वर्ष पासून राष्ट्रवादीची सत्ता होती. सध्य स्थितीत  राष्ट्रवादीतून  माजी अर्थ शिक्षण सभापती असणारे संजय देसाई यांचे वरिष्ठ पातळीवर असणारे संबंधातून खा. श्रीनिवास पाटील यांच्या माध्यमातून अनेक सामाजिक कामे जनतेपर्यंत पोचवण्याचे काम केलेलं दिसत आहे याचा फायदा देसाई यांना होणार आहे असे दिसते. 

 सध्य स्थितीत शिवसेनेने कंबर कसलेली दिसत आहे. ना. शंभूराज देसाई यांनी प्रत्येक गाव, वाडीवस्तीवर दिलेली विकासकामे व कोरोना काळात सामाजिक बांधिलकी जोपासत त्यांनी गावो गावी जनतेला दिलेला दिलासा त्यामुळे जनतेपर्यंत  पोहोचण्यात यशस्वी होताना दिसत आहे.

 तर माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण गट राष्ट्रीय पेयजल योजनेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचत आहेत. 

देसाई गटाचे नेतृत्व बाळासाहेब देसाई साखर कारखान्याचे माजी चेअरमन डॉ.दिलीपराव चव्हाण करतील तर कॉंग्रेस कडून राहुल चव्हाण, राजेंद्र चव्हाण, योगेश पाटणकर नेतृत्व करतील. तर माजी शिक्षण सभापती संजय देसाई व जिल्हा बँकेचे माजी संचालक भगवानराव पाटील सत्ताधारी गटाचे नेतृत्व करतील

 नैसर्गिक अपत्ती आणि कोरोनाने गेले 6 महिने कुंभारगाव विभागातील मतदार हा, मुंबई, पुणे, अन्य राज्यात नोकरी, काम धंद्या निमित्ताने असणारा प्रत्येकजण आपल्या घरीच बसून होता त्यामुळे सर्व सामान्य, मध्यम वर्गीय कुटूंबाचे कंबरडे मोडले आहे . सध्य स्थितीत कोरोनाचे प्रमाण कमी झाल्याने घरी बसून असणारे सर्व कामानिमित्ताने परगावी मुंबई, पुणे, अन्य राज्यात परत गेले असून ग्रामपंचायत निवडणुकीपासून अलिप्त राहण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे गावपातळीवर पॅनेलच्या नेत्याची डोके दुखी वाढवण्याची बाब समोर येत आहे. तसेच सरपंच पदाचे आरक्षण निवडणुकी नंतर असल्याने सरपंच पदाचे दावेदार चिंतातुर झाल्याचे पाहावयास मिळत आहे. एकूण परिस्थिती पाहता जेष्ठ जाणकार नागरिक, व सुशिक्षित वर्ग  यांची ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध व्हावी असे मत आहे. शिवसेनेचे डॉ.दिलीपराव चव्हाण यांनी बिनविरोध ची हाक देऊन शासनाचे पंचवीस लाखाचे पारितोषिक गावाला मिळवूया व एकत्र येऊन गावाचा विकास करूया या हाकेला राष्ट्रवादीचे माजी अर्थ शिक्षण सभापती संजय देसाई यांनी होकार दर्शवला आहे व कॉग्रेसचे पाटण तालुका उपाध्यक्ष माजी उपसरपंच राजेंद्र चव्हाण यांनी बिनविरोध निवडणुकीला होकार दर्शवला असून सामूहिक चर्चेला तयार असल्याची माहिती  दैनिक कृष्णाकाठला दिली.