सलग दोन खुनाच्या घटनेने कराडकर हादरले...‼️

 

कराड/प्रतिनिधी :

           कराडमध्ये गेल्या दोन दिवसात सलग दोन खून झाल्याने शहरासह तालुक्यात खळबळ उडाली आहे. येथील बाराडबरे परिसरात सोमवारी एका अल्पवयीन युवकाचा धारदार शस्त्राने वार करून निघृण खून केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी गुन्हे प्रकटीकरण शाखेने तीन अल्पवयीन संशयितांना ताब्यातही घेतले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी मंगळवारी रात्री येथील भाजी मंडई परिसरात एका 30 वर्षीय युवकाचा धारदार शस्त्रासह डोक्यात फरशी घालून खून केल्याची घटना घडली आहे. 

या घटनेची नोंद शहर पोलीस ठाण्यात झाली आहे. याबाबत जावीर जहांगीर आंबेकरी यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.         

          जुबेर जहांगीर आंबेकरी (वय 30) रा. कुरेशी मोहल्ला, कराड असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.

          याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मंगळवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या  सुमारास भाजी मंडई परिसरात भांडण सुरु असताना जुबेर आंबेकरी याच्यावर तीन संशयितांनी हल्ला केला. या हल्यात संशयित आरोपींनी धारदार शस्त्राने वार करून डोक्यात फरशी घालून त्याचा खून केला. हल्यानंतर संशयित हल्लेकरूंनी घटनास्थळावरून पलायन केले. खुनी हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या जुबेरला उपचारासाठी येथील वेणूताई चव्हाण  उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

            घटनेची माहिती मिळताच पोलिस उपाधीक्षक डॉ. रणजीत पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पंचनामा करून पोलिसांनी तपासास गतीने सुरुवात केली आहे. याबाबत जावीर जहांगीर आंबेकरी यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील करीत आहेत.