कराडात अल्पवयीन युवकाचा भररस्त्यात निर्घृण खून; परिसरात एकच खळबळ

 


कराड / प्रतिनिधी : कराड येथील बाराडबरी परिसरातील राजवैभव किराणा स्टोअर्सच्या समोर सायंकाळी 4 च्या सुमारास धारदार शस्त्राने वार करून अल्पवयीन मुलाचा खून झाल्याची घटना घडली. तीन संशयित मारेकरी घटनास्थळावरून पसार झाले आहेत. आदित्य गौतम बनसोडे (वय 16) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. आदित्य बनसोडे हा बाराडबरे परिसरात राहतो. सोमवारी दुपारी तो बाराडबरे परिसरात राजवैभव किराणा स्टोअर्ससमोर उभा होता. त्यावेळी तीन संशयित युवक तेथे आले. त्यांनी आदित्यवर वार करायला सुरूवात केली. आदित्यने आरडाओरडा केला. तिनही संशयितांनी पोटावर वार केल्याने आदित्य रस्त्यावर पडला. रक्तास्त्राव मोठ्या प्रमाणात होऊ लागला. हल्ला करून संशयित पसार झाले. हा प्रकार पाहून परिसरातील लोक घटनास्थळी धावले. आदित्यच्या कुटूंबियांनी नागरिकांच्या मदतीने त्याला तत्काळ उपजिल्हा रूग्णालयात हलवले. तेथे प्रार्थमिक उपचार करून त्याला कृष्णा रूग्णालयात हलवण्यात आले. कृष्णा रूग्णालयातील डॉक्टरांनी आदित्यला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच डिवायएसपी डॉ. रणजीत पाटील, वरिष्ठ पोलीस निरिक्षक बी. आर. पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून चौकशी सुरू केली. संशयितांच्या शोधासाटी पोलीस पथक रवाना झाले. आदित्यचा खून कशासाठी झाला याचा शोध पोलीस घेत आहे. रात्री उशीरा याप्रकरणी आदित्याचे वडिल गौतम बनसोडे यांनी शहर पोलिसात खबर दिली.