गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांना 54 चित्रांची भेट


तळमावले/वार्ताहर

पाटण तालुक्यातील डाकेवाडी काळगांव येथील युवा चित्रकार डाॅ.संदीप डाकवे यांनी गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई (गृह (ग्रामीण), वित्त, नियोजन राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन महाराष्ट्र राज्य) यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तब्बल 54 विविध भावमुद्रा रेखाटल्या होत्या. या चित्रांची फ्रेम ना. देसाई यांना तळमावले येथील एका कार्यक्रमादरम्यान नुकतीच भेट दिली. डाॅ.संदीप डाकवे यांनी रेखाटलेली 54 चित्रे स्कॅन करुन त्याची प्रिंट काढून सदर फ्रेम तयार करण्यात आली होती. विशेष म्हणजे या फ्रेमची साईज 54 बाय 54 इंच अशी होती. मूळ रेखाटलेले प्रत्येक चित्र 21 सेमी बाय 28 सेमी या आकाराचे आहे. या अनोख्या भेटीने ना.देसाई भारावून गेले.

‘‘सोशल मिडीयाच्या माध्यमातून व्हाॅटसअपवर आपण रेखाटलेली ही चित्रे मी बारकाईने पाहीली असून ती छान आहेत’’ असे म्हणत ना.देसाई यांनी डाॅ.संदीप डाकवे यांच्या कलेचे कौतुक केले. ‘‘सदर चित्रे काढताना किती वेळ लागला?’’ याचीही माहिती त्यांनी यावेळी घेतली. सदर फ्रेम ना.देसाई यांना देताना त्यांच्यासमवेत चंद्रकांत चव्हाण, संजय लोहार, तुषार देशमुख, जीवन काटेकर, चि.स्पंदन डाकवे व अन्य मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान या रेखाटलेल्या चित्रांचे प्रदर्शन भरवणार असल्याचा मानस डाॅ.संदीप डाकवे यांनी व्यक्त केला आहे. याची नोंद ‘इंडिया बुक ऑफ रेकाॅर्ड’ कडे होण्यासाठी डाॅ.डाकवे यांनी पत्रव्यवहार देखील केला आहे.

केवळ चित्र न रेखाटता डाॅ.संदीप डाकवे यांनी कलेच्या माध्यमातून आतापर्यंत नाम फाऊंडेशनला रु.35,000/-, केरळ पुरग्रस्तांना रु.21,000/- , आर्मी वेल्फेअर बॅटल कॅज्युअल्टीज ला रु.5,000/-, माजी सैनिक हणमंतराव पाटील यांना रु.5,000/-, मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19 ला रु.4,000/-, मुख्यमंत्री सहाय्यता निधी पुरग्रस्तांना रु.3,000/-, भारत के वीर या खात्यात रु.1,000/- चा निधी देवून कलेतून सामाजिक बांधिलकी जपली आहे.

यापूर्वी गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांना वाढदिवसानिमित्त ठिपक्यातून चित्र, अक्षरगणेशा, पोट्रेट,  रांगोळीतून व्यक्तिचित्र साकारत शुभेच्छा दिल्या आहेत. प्रत्येक वाढदिवसाला काहीतरी ‘हटके’ शुभेच्छा देण्याचा प्रयत्न डाॅ.डाकवे यांचेकडून होत असतो.

डाॅ.संदीप डाकवे यांनी चित्रांची फ्रेम दिल्यानंतर कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या लोकांच्या मध्ये त्या चित्रांची चर्चा बराच काळ रंगली होती.