शशिकांत भिंगारदेवेला खुणावतोय ‘टीव्ही’चा पडदा

 
‘विठू माऊली’ व ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतील दृश्यांत शशिकांत भिंगारदेवे

तळमावले/संदीप डाकवे :

टीव्हीच्या पडद्यावर आपण एकदा तरी चमकावे असे स्वप्न कित्येकांचे असते. असेच एक सोनेरी स्वप्न पाटण तालुक्यातील आचरेवाडी शांतीनगर येथील युवक पाहत आहे. काही अंशी त्याचे हे स्वप्न पुर्ण झाले तरी यशाला अजून गवसणी घालण्याचे ध्येय त्याने बाळगले आहे. त्यासाठी तो प्रचंड मेहनत देखील करत आहे. शशिकांत तानाजी भिंगारदेवे असे या युवकाचे नाव आहे.

‘स्टार प्रवाह’ या वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या सुप्रसिध्द मालिकेत शशिकांत याने छोटेखानी भूमिका साकारुन महाराष्ट्रातल्या  घराघरात आपली कला पोहोचवली आहे.

वडिलांचा जनावरे देण्या-घेण्याचा व्यवसाय. घरात सात ते आठ खाणारी तोंडे असे असतानादेखील आपल्या स्वप्न पाहण्यासाठी शशिकांतने जीवतोड मेहनत केली आहे. शिक्षणाचे महत्त्व जाणलेल्या शशिकांत यांनी डी.एड, बी.एड या पदव्या मिळवत आपल्या कुटूंबाला आकार देण्याचा प्रयत्न केला आहे. हे करताना आपली कलेविषयी असलेली आवड देखील तितक्याच तन्मयतेने जपली आहे.

‘‘लहानपणी बॅंड मध्ये ढोल उचलण्याचे काम करायचो. त्यानंतर हळूहळू गायनाचे काम करु लागलो. मी गायलेली गाणी लोकांना खूप आवडत. माझ्या कलेची हौस मी अशा पध्दतीने पूर्ण करत असे. कालांतराने काॅलेज पूर्ण झाल्यानंतर अभिनयाचे वेड वाढले गेले. लेखनाचा छंद ही मोठया आवडीने जपला. मी लिहलेल्या लेखनाला राज्यस्तरावर पारितोषिकदेखील मिळाले आहे.’’ असे शशिकांत बोलताना म्हणाला.

आतापर्यंत शशिकांत ने ‘उंडगा’ ही शाॅर्टफिल्म, दान, लाईफ ब्लाॅक या मध्ये काम केले आहे. तर  ‘लागीर झालं जी’, ‘विठू माऊली’, ‘लक्ष्य’ या मालिकांत छोटेखानी भूमिका साकारल्या आहेत. सन 2000 मध्ये गोरेगांव येथे राज्यस्तरीय समई नृत्यात प्रथम पारितोषिक पटकावले आहे. अभिनयासाठी तालुका, जिल्हा, राज्य स्तरावर पारितोषिके मिळवली आहेत. जिल्हा परिषद रायगड च्या वतीने त्याचा सत्कार झाला आहे.

रायगड जिल्हयातील म्हसब तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेमध्ये शशिकांत भिंगारदेवे ज्ञानदानाचे पवित्र काम प्रामाणिकपणे करत आहेत. आपल्या कलेला अजूनही म्हणावा तशी संधी मिळाली नसल्याची खंत त्याने व्यक्त केली आहे.

भविष्यात प्रामाणिक मेहनत, योग्य मार्गदर्शन यातून टीव्हीच्या पडद्यावर झळकण्याचे स्वप्न शशिकांत नक्की साकारतील यात कोणतीही शंका नाही. त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा..!