ढेबेवाडी ता. पाटण येथे पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीतील मोटारी नादुरुस्त झाल्याने तांत्रिकदृष्ट्या निर्माण झालेल्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी व ग्रामस्थांची पाण्यासाठी होणारी पायपीट थांबविण्या साठी जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील यांनी स्वतःच्या टँकरद्वारे गावाल मोफत पाणी पुरवठा करून ग्रामस्थांना दिलासा दिला.
ढेबेवाडीला नळपाणी पुरवठा योजनेची भोसगावच्या शिवारात वांग नदीवर विहीर आहे, वांग-मराठवाडी धरणांमुळे नदीला बारमाही पाणी उपलब्ध असते. यामुळे ढेबेवाडी येथील पाणीपुरवठा योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित आहे. मात्र नळ पाणी पुरवठ्याच्या विहिरीवरील राखीव मोटार सह चालू मोटर अशा दोन्ही मोटारी अचानक नादुरुस्त झाल्याने सलग चार दिवस पाणीपुरवठा खंडित झाला. त्यामुळे ग्रामस्थांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता.ग्रामपंचायत प्रशासनाने नादुरुस्त झालेल्या मोटारी विहिरीतुन काढुन तातडीने दुरूस्तीसाठी पाठविल्या होत्या. शुक्रवारी या मोटारी विहिरीमध्ये बसविण्याचे काम सुरू होते.
पाणी टंचाई सुरु झाल्यावर भटकंती मुळे त्रस्त ढेबेवाडी ग्रामस्थांनी व ग्रामपंचायत प्रशासनाने जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील यांच्याशी संपर्क साधल्या नंतर रमेश पाटील यांनी स्वतःच्या टँकरने आवश्यकते नुसार पाणीपुरवठा सुरू केला व पाणीटंचाई च्या काळात येथील जनतेला दिलासा दिला असुन या बाबत ग्रामस्थामधुन धन्यवाद देण्यात येत आहेत.