स्व. पी. डी. पाटील हे राजकारणातील निर्मोही नेतृत्व : खा. श्रीनिवास पाटील

कालिकादेवी पतसंस्थेचा "यशवंतराव चव्हाण सामाजिक कृतज्ञता पुरस्कार' सोहळा संपन्न


कराड/प्रतिनिधी :

यशवंतरावांच्या छत्रछायेखाली राजकारण, सहकार, शिक्षण, नगरविकास अशा अनेक क्षेत्रात कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी ज्येष्ठ नेते स्व. पी. डी. पाटीलसाहेब यांना मिळाली. राजकारणामध्ये अनेक सत्तास्थाने त्यांच्या वाट्याला आली. मात्र, या सत्तास्थानांचा उपयोग फक्त सर्वसामान्यांच्या विकासासाठी करण्याचा ध्यास घेतलेले स्व. पी. डी. पाटीलसाहेब राजकारणातील निर्मोही नेतृत्व होते, असे गौरवोद्‌गार सिक्कीमचे माजी राज्यपाल, खा. श्रीनिवास पाटील यांनी काढले.

येथील सौ. वेणूताई चव्हाण सांस्कृतिक सभागृहामध्ये श्री कालिकादेवी नागरी सहकारी पतसंस्थेच्यावतीने आयोजित केलेल्या “यशवंतराव चव्हाण सामाजिक कृतज्ञता’ पुरस्कार सोहळ्यात ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. स्व. पी. डी. पाटीलसाहेब यांना समर्पित केलेला हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी राज्याचे सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून इंद्रजित देशमुख, तसेच व्यासपीठावर श्री कालिका कुटुंबप्रमुख मुनीर बागवान-सावकार, चेअरमन डॉ. जयवंत सातपुते, अरुण जाधव, प्रा. अशोक चव्हाण व संचालक मंडळ उपस्थित होते.

श्रीनिवास पाटील पुढे म्हणाले, 22 नोव्हेंबर हा यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनातील महत्वाचा दिवस होता. 22 नोव्हेंबर 1966 ला यशवंतरावांनी देशाचे संरक्षणमंत्री म्हणून शपथ घेतली. 22 नोव्हेंबरलाच यशवंतरावांच्या विचारांची पाठराखण करणारे त्यांचे सच्चे अनुयायी स्व. पी. डी. पाटील यांना हा पुरस्कार समर्पित होत आहे, हा आगळा योगायोग आहे.

इंद्रजित देशमुख म्हणाले, यशवंतवारांचा लोकशाहीवर प्रचंड विश्वास होता. त्यांचे अनुकरण स्व. पी. डी. पाटील यांनी आयुष्यभर केले.

पी. डी. पाटील हे राजकारणात राहूनही सर्व मोहाचा परित्याग करणारे व्यक्तिमत्व होते. सत्ता, संपत्ती, राजकारण, कुटुंबिय यांचा परित्याग करुन प्रायोपवेशनाच्या माध्यमातून देह त्याग करण्याची खंबीर भूमिका त्यांनी घेतली. या व्यक्तीमत्वाकडे देवत्व होते म्हणून त्यांच्या इच्छेनुसार ते देवाघरी जाऊ शकले हे राजकारणी असूनही त्यांचे वेगळे वैशिष्ट्य होते.

बाळासाहेब पाटील म्हणाले, यशवंतरावांच्या कर्मभूमीतील श्री कालिकादेवी पतसंस्था आधुनिकतेची कास धरीत स्वत:च्या वास्तूमध्ये प्रचंड विस्तारली आहे. लोकांचा विश्वास संपादन केला आहे. यशवंतराव चव्हाणांच्या विचारांचा जागर करणाऱ्या व्यक्तींना पुरस्काराने सन्मानित करुन आदर्श असा उपक्रम संस्थेने राबविला आहे. ज्यांनी यशवंत विचारांची पाठराखण करीत या गावाची व परिसराची सेवा केली. सहकार, शिक्षण, बॅंकींग, राजकारण अशा विविध क्षेत्रात आयुष्यभर कार्य करणाऱ्या स्व. पी. डी. पाटीलसाहेब यांना हा पुरस्कार समर्पित करुन आदर्श परंपरा निर्माण केली आहे.

प्रास्ताविकात प्रा. अशोक चव्हाण म्हणाले, पतसंस्थेकडे 113 कोटी रुपयांच्या ठेवी असून स्थापनेपासूनच संस्था सभासदांना 15 टक्के लाभांश देत आहे. रौप्यमहोत्सवानिमित्त सभासदांना एक ग्रॅम सोन्याचे नाणे व त्रिदशकपूर्ती वर्षात सभासदांना 30 टक्के लाभांश दिला आहे. यशवंतराव चव्हाण व पी. डी. पाटीलसाहेब यांच्या कार्यप्रणालीचा अवलंब केल्यानेच संस्थेला यश मिळाले असल्याचेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमात कराड शहर पोलीस प्रमुख बी. आर. पाटील, सामाजिक कार्यकर्ते सलीम मुजावर, रणजित पाटील (नाना) यांचा कोविड महायोद्धा म्हणून सत्कार करण्यात आला.

कु. वैष्णवी वेळापुरे यांनी पी. डी. पाटीलसाहेब यांचे काढलेले पेन्सिल स्केच ना. बाळासाहेब पाटील यांना भेट देण्यात आले. विठामाता विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी आ. स्व. पी. डी. पाटील गौरव गीत सादर केले. सौ. संगीता भोई यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. डॉ. संतोष मोहिरे यांनी आभार मानले.

कार्यक्रमास पतंस्थेचे संचालक, सभासद व पी. डी. पाटील यांच्या कुटुंबियासह परिसरातील अनेक मान्यवर, नागरिक उपस्थित होते.