निसर्गाचे वातावरण अनुभवण्यासाठी ‘झुंजूमुंजू’ कवितासंग्रह अवश्य वाचा

 


निसर्गाचे वातावरण अनुभवण्यासाठी ‘झुंजूमुंजू’ कवितासंग्रह अवश्य वाचा

        अंधेरी येथील कवयित्री दिपाली साळवी यांचा ‘झुंजूमुंजू’ हा दुसरा कविता संग्रह. नुकताच वाचनात आला. पहिला कविता संग्रह शंभर नंबरी हा वाचकांच्या पसंतीस पडला आहे. या कविता संग्रहाच्या प्रसंगी मी उपस्थित होतो हे मी माझे भाग्य समजतो. दै.नवाकाळ व इतर दैनिके, दिवाळी अंक, मासिके, साप्ताहिके यामधून दिपाली साळवी यांच्या कविता प्रसिध्द झालेल्या आहेत. काही दिवसापूर्वी त्यांनी ‘झुंजूमुजू’ हा काव्यसंग्रह प्रकाशित केला आहे. हा ‘झुंजूमुंजू’ कवितासंग्रह निसर्गावर आधारित आहे. तो ‘झुंजूमुंजू’ हा नावाप्रमाणे भल्या पहाटेच्या अतिशय आनंददायी वातावरणातील सकाळच्या प्रहरापासून ते संध्याकाळ आणि रात्रीच्या प्रहरापर्यंत ज्या-ज्या वेळेनुसार निसर्गावर सुचलेल्या निसर्गातील झाडे-वेली, कळी, पाने-फुले दवबिंदुचे थेंब, आकर्षक विविध रंगी फुले, फुलपाखरे, कोकीळ ह्या सर्वांवर आधारित कविता वाचावयास मिळतात. अगदी गावाकडच्या घरापासून ते संध्याकाळची दिवेलागण आकाशातील चंद्रमा पर्यंत जे कवयित्रीला अनुभवायला मिळाले. त्याचे तिने अगदी छान शब्दात वर्णन केले आहे. यातील कविता वाचल्यावर आपणास गावाकडची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. कविता वाचकांना नक्कीच आनंद देतील.असे मनापासून वाटते.


     झुंजूमुंजू, पहाट, सूर्यबिंब, निसर्गाचे नंदनवन, फुल, कळी, पाऊस, पहाटेचे स्वप्न, झाड आणि पाणी, स्वप्नसुंदरी, काव्यपरी, फुलपाखरू, बालपणीचा काळ सुखाचा, गावाकडचे घर, मानवा एवढे करून बघ, चंद्रमा, पाऊस  गाणे, चांदोबा चांदोबा यासारख्या कविता वाचल्यावर बालपणीच्या आठवणीने अगदी मन प्रसन्न होऊन त्या बालपणीच्या दुनियेत पुन्हा गेल्यासारखे वाटते.

संतोष प्रकाशन ने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. अतिशय सुंदर असे हे कवितासंग्रहाचे पुस्तक आहे. निसर्गाचे वातावरण अनुभवण्यासाठी ‘झुंजूमुंजू’ कवितासंग्रह अवश्य वाचा.


- लेखन: डाॅ.संदीप डाकवे