काटेकर परिवाराचा आकाश कंदील करतोय जनजागृती.


काटेकर परिवाराचा आकाश कंदील करतोय जनजागृती


तळमावले/वार्ताहर


अंधारातून प्रकाशाकडे नेणारा सण म्हणून दिपावलीकडे पाहिले जाते. हा सण सर्वत्र मोठया उत्साहात साजरा होता. या सणाला घरात व घराबाहेर तेलाचे लहान दिवे लावले जातात.उंच जागी आकाश कंदिल लावला जातो. घराबाहेर रांगोळी काढून सुशोभन केले जाते. घराघरात फराळाची रेलचेल पाहायला मिळते. पावसाळा संपून नवीन पीके हाती आल्यानंतर शरद ऋतूच्या ऐन मध्यभागी, आश्विन व कार्तिक या महिन्याच्या संधिकालात हा सण येतो. आश्विन वद्य व्दादशी ते कार्तिक शुध्द व्दितीया हे सहा दिवस या सणाचे असतात. हा सण साधारणपणे आॅक्टोंबर नोव्हेंबर दरम्यान येत असतो.


यंदाच्या दिवाळीवर कोरोनाचे सावट आहे. तरीदेखील लोकांमधील दिपावलीबद्दल असलेली हौस कमी झालेली दिसत नाही. पाटण तालुक्यातील पाचुपतेवाडी (गुढे) येथील काटेकर परिवाराने तयार केलेला आकर्षक आकाश कंदील लक्ष वेधून घेत आहे. या आकाश कंदिलामधून जनजागृती होत आहे. या कंदिलाच्या बाजूवर समाजोपयोगी संदेश लिहले आहेत. व्यसने सोडा, संसार जोडा, धुम्रपानाची फॅशन मृत्यूला निमंत्रण असे विविध प्रकारचे व्यसनमुक्तीविषयक संदेश लिहले आहेत. ते प्रभावी ठरत आहेत.


वसुबारसेच्या पुर्वसंध्येला काटेकर परिवाराने हा आकाश कंदिल आपल्या दरवाजाजवळ लावला आहे. तो येणा-जाणारयांचे लक्ष वेधून घेत आहे. विविध रंगाच्या कार्डशीट पेपरच्या माध्यमातून हा आकर्षक कंदिल केला आहे. टाकाऊपासून टिकाऊ असे या आकाश कंदिलाबद्दल बोलता येईल. हा आकाश कंदिल लावताना काटेकर परिवारातील जीवन काटेकर, तानाजी काटेकर, सुनंदा काटेकर, नंदा पाचुपते, तारुबाई काटेकर व इतर उपस्थित होते.


जीवन काटेकर हा ग्राफीक डिझायनर म्हणून काम करत आहे. डिझायनींगचे काम करत असताना यंदा दिवाळीला वेगळे काहीतरी करावे या भावनेतून त्याला ही संकल्पना सुचली. शिवसमर्थ पब्लिकेशन प्रा.लि; मध्ये मशीन आॅपरेटर म्हणून जानुगडेवाडी येथील श्री.सुनील माने काम करतात. काम करत असताना फावल्या वेळेत त्यांनी हे आकाश कंदील केले आहेत. सुनील माने हे कलाप्रेमी आहेत. जीवन काटेकर यांना आकाश कंदिल करत असताना त्यांचे बहूमूल्य सहकार्य लाभले. या कंदिलाचे आणि त्यावरील समाज प्रबोधनपर संदेशाचे परिसरातून कौतुक होत आहे.