डाॅ.संदीप डाकवे यांच्या ‘समाज स्पंदनाची पत्रे’ पुस्तकाचे प्रकाशन


डाॅ.संदीप डाकवे यांच्या ‘समाज स्पंदनाची पत्रे’ पुस्तकाचे प्रकाशन


तळमावले/वार्ताहर


जागतिक टपालदिनी काळगांव येथील डाकघरात ‘समाज स्पंदनाची पत्रे’ या पुस्तकाचे अनावरण करत आगळ्यावेगळ्या प्रकाषनाची परंपरा डाॅ.संदीप डाकवे यांनी जपली आहे. या अनोख्या सोहळ्याप्रसंगी काळगांव डाकघरातील पोस्ट मास्तर श्री.लक्ष्मण कुंभार, पोस्टमन श्री. बाळासाहेब देसाई, पुस्तकाचे लेखक डाॅ.संदीप डाकवे, प्रथमेश डाकवे व अन्य मान्यवर उपस्थित होते.


यावेळी डाकघरातील अधिकार्‍यांचा शाल व पुस्तक देवून सन्मान करण्यात आला. या सत्कारामुळे पोस्टमन काका भरावून गेले. विशेष म्हणजे डाॅ.संदीप डाकवे यांनी पहिले पत्र याच पोस्टातून पाठवले व त्याचे उत्तरदेखील याच पोस्टाच्या टपाल पेटीतून मिळाले हा एक अनोखा योगायोग मानावा लागेल.


पत्रलेखन सोशल मिडीयाच्या जमान्यात कालबाह्या होत असताना डाॅ.संदीप डाकवे यांनी महाविद्यालयीन जीवनात लिहलेल्या विविध पत्रांच्या संग्रहाचे पुस्तक हा ठेवाच आहे. डाॅ.डाकवे यांचे हे आतापर्यंतचे 4 थे पुस्तक आहे. प्रत्येक पुस्तक प्रकाशनासाठी त्यांनी आगळावेगळा मुहूर्त व प्रमुख पाहुणे निवडले आहे. पहिल्या ‘मनातलं’ या चारोळी संग्रहाचे पुस्तकाचे प्रकाशन स्वतःच्या वाढदिनी अग्रलेखांचे बादशहा पद्मश्री नीलकंठ खाडीलकर, शिवसमर्थ समुहाचे शिल्पकार अॅड.जनार्दन बोत्रे व इतर मान्यवर यांच्या हस्ते केले होते. दुसर्‍या ‘जलयुक्त शिवार अभियान’ या लेखसंग्रह पुस्तकाचे प्रकाशन लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या जयंतीदिनी माजी मुख्यमंत्री ना.देवेेंद्र फडणवीस, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, माजी पालकमंत्री विजयबापू शिवतारे, माजी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल व अन्य मान्यवर यांच्या उपस्थितीत झाले. तिसर्‍या दीप उजळतो आहे या फोटोबायोग्राफी पुस्तकाचे प्रकाशन गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर आई सौ.गयाबाई डाकवे, वडील श्री.राजाराम डाकवे, पत्नी सौ.रेश्मा डाकवे, मुलगा चि.स्पंदन डाकवे व कुटूंबियांच्या हस्ते केले. तर आताच्या पत्रसंग्रह पुस्तकाचे प्रकाशन 9 आॅक्टोंबर या जागतिक टपालदिनी काळगांव येथील डाकघरात करुन अनोखा मुहूर्त साधला आहे.


विशेष म्हणजे डाॅ.संदीप डाकवे यांनी विविध सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम राबवत पत्रमैत्रीचा छंद मोठया कौशल्यपूर्वक जपला आहे. विविध मान्यवरांनी प्रत्यक्ष पत्रे पाठूवन त्यांच्या या छंदाचे कौतुक केले आहे. तसेच गतवर्षी 9 आॅक्टोंबर या जागतिक टपालदिनी इलेक्ट्राॅनिक मिडीयावर डाॅ.डाकवे यांच्या पत्रमैत्री छंदावर स्पेशल रिपोर्ट प्रदर्शित करण्यात आला होता. डाॅ.संदीप डाकवे यांची 500 पेक्षा जास्त पत्रे विविध साप्ताहिके, दैनिके, मासिके यात प्रसिध्द झाली आहेत.


डाॅ.संदीप डाकवे यांच्या या अनोख्या प्रकाशनाची चर्चा काळगांव येथील डाकघरात रंगली होती.