एसपी तेजस्वी सातपुते यांना डाॅ.संदीप डाकवे यांचेकडून 5000 वे स्केच भेट


छाया : अनिल देसाई


एसपी तेजस्वी सातपुते यांना डाॅ.संदीप डाकवे यांचेकडून 5000 वे स्केच भेट


तळमावले/वार्ताहर :


सातारा जिल्हयाच्या डॅशिंग एस.पी. तेजस्वी सातपुते यांना पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील युवा चित्रकार डाॅ.संदीप डाकवे यांनी रेखाचित्र भेट दिले. डाॅ.डाकवे यांनी भेट दिलेेले हे 5000 वे रेखाचित्र आहे.याप्रसंगी त्यांच्यासमवेत वांगव्हॅली पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय लोहार, तुषार देशमुख, छायाचित्रकार अनिल देसाई, बाळासाहेब रोडे, नितीन बेलागडे व अन्य मान्यवर उपस्थित होते. डाॅ.संदीप डाकवे यांनी आतापर्यंत विविध क्षेत्रातील मान्यवर, राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, खेळाडू, पत्रकार, प्रशासनातील दिग्गज व्यक्ती तसेच सेलिब्रिटी यांना त्यांची हुबेहुब व्यक्तिचित्र रेखाटून त्यांना ‘सरप्राईज’ भेटी दिल्या आहेत.


त्यांच्या या अनोख्या छंदाची नोंद ‘इंडिया बुक आॅफ रेकाॅर्ड’, ‘हायरेज बुक आॅफ वल्र्ड रेकाॅर्ड’ या पुस्तकात झाली आहे. नेहमीच कलेच्या माध्यमातून डाॅ.डाकवे यांनी आपले वेगळेपण जपत कलेतून स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रात आपले भरीव योगदान दिले आहे. डाॅ.संदीप डाकवे यांची आतापर्यंत 4 पुस्तके प्रकाशित झाली असून त्यांनी पत्रकारिता, चित्रकारिता, लेखन, साहित्य यामध्ये आपले वेगळेपण सिध्द केले आहे. त्यांना महाराष्ट्र राज्य शासनाकडून 4 तर विविध संस्थांकडून सुमारे 30 हून अधिक पुरस्कारांनी गौरवले आहे.


सातारा जिल्हा पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांना व्यक्तिचित्र भेट देण्यासाठी सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे यांचे विशेष सहकार्य लाभले. जास्तीत जास्त दिग्गज व्यक्तिमत्त्वांना त्यांची व्यक्तिचित्रे भेट देवून त्याची नोंद जागतिक स्तरावर ‘गिनीज बुक आॅफ रेकाॅर्ड’, ‘लिम्का बुक आॅफ वल्र्ड रेकाॅर्ड’ या मध्ये करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे मत डाॅ.संदीप डाकवे यांनी व्यक्त केले आहे. तसेच चित्रे भेट दिलेल्या निवडक व्यक्तींचे फोटो, आॅटोग्राफ, व्यक्तिचित्र असलेले आगळेवेगळे पुस्तक तयार करण्याचा मानसही त्यांनी केला आहे.


---------------------------------------


एसपी तेजस्वी सातपुते यांनी स्वतःचे व्यक्तिचित्र पाहून डाॅ.संदीप डाकवे यांच्या कलेचे तोंडभरुन कौतुक केले. ‘चित्र खुप सुंदर झाले आहे, ते कोणत्या माध्यमात केले आहे.’ अशी आवर्जून विचारपूस करत आपल्यातील कलात्मक दृष्टीकोनाचे दर्शन घडवले.


---------------------------------------