'कोरोना'विरुद्धच्या लढाईत सत्यजितसिंह पाटणकर यांचा पुढाकार, रुग्णांसाठी अॉक्सिजन बेडची सुविधा स्वखर्चाने उपलब्ध करून देणार.


'कोरोना'विरुद्धच्या लढाईत सत्यजितसिंह पाटणकर यांचा पुढाकार, रुग्णांसाठी अॉक्सिजन बेडची सुविधा स्वखर्चाने उपलब्ध करून देणार.


 


पाटण / प्रतिनिधी (भगवंत लोहार ) 


        सध्या पाटण मतदारसंघात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. उपचारासाठी पाटण तालुक्यातील रुग्णांना कराड व अन्य ठिकाणी घेऊन जावं लागत आहे. परंतु सातारा जिल्ह्यात सर्वत्रच कोरोनाने थैमान घातले असल्याने दुर्दैवाने या रुग्णांना तिथे उपचारासाठी बेड सुध्दा मिळत नाहीत. यामुळे अनेक रुग्णांना उपचाराअभावी आणि उपचारांसाठी होत असलेल्या दिरंगाईमुळे आपला जीव गमवावा लागला आहे. यामुळेच पाटण तालुक्यातील कोरोनाचा मृत्यदरही जास्त आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आणि एक सामाजिक जबाबदारी म्हणून पाटण विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी वैयक्तिक खर्चातून व काही सहकारी, खाजगी संस्था आणि ट्रस्टच्या माध्यमातून पाटण येथील समाज कल्याण विभागाच्या नुतन वसतीगृहातील कोरोना केअर सेंटरमध्ये आवश्यक त्या प्रमाणात आॅक्सिजन बेडची सुविधा उपलब्ध करून देण्यास आम्हीं तयार आहोत असे त्यांनी सांगितले. तसे निवेदनही त्यांनी पाटणचे उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे यांना दिले. जर शासकीय परवानगी मिळाली तर ४-५ दिवसांत या सुविधा उपलब्ध करून देऊ पण आपल्या तालुक्यातील एकाही व्यक्तीचा उपचाराअभावी जीव जाऊ नये असेही त्यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर त्यांनी सांगितले जर कोरोनाग्रस्त रुग्णांच्या उपचारासाठी जागा कमी पडत असेल तर स्वमालकीचे पाटण येथील मंगल कार्यालय व पाटण स्पोर्ट्स क्लबचे स्टेडियम सुध्दा तत्काळ देऊ असेही त्यांनी यावेळी सांगितले.


           सत्यजितसिंह पाटणकर यांनी कोरोना लढाईमध्ये दाखवलेल्या दानशूरपणा बद्दल समाजातील सर्व स्तरातील लोकांकडून कौतुक केले जात आहे. पाटणकर यांनी यापूर्वीही मोठ्या प्रमाणात स्वखर्चाने लोकांसाठी सॅनिटायझर, मास्क, अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंची मदत केली आहे. खरंच आज पाटणकर यांच्या सारख्या नेत्यांची संपूर्ण देशभरात गरज आहे.


           यावेळी त्यांच्या समवेत पाटण अर्बन बँकेचे चेअरमन दिनकर घाडगे, खरेदी विक्री संघाचे चेअरमन अॅड. अविनाश जानुगडे, पाटण दुध संघाचे चेअरमन शंकरराव जाधव, पाटण विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस सुभाष पवार, नाना शिरसागर व इतर मान्यवर उपस्थित होते.