साळशिरंबे येथील पैलवान तानाजी चवरे मित्र मंडळाची सामाजिक बांधिलकी.


साळशिरंबे येथील पैलवान तानाजी चवरे मित्र मंडळाची सामाजिक बांधिलकी.


ऑक्सिजन कोरोनाग्रस्तांसाठी संजीवनी


उंडाळे / प्रतिनिधी :


कोरोनाचे वाढते प्रमाण चिंताजनक बनत चालले आहे. सातारा जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. कराड तालुका तर हॉटस्पॉट बनला आहे. अनेक बाधित रुग्ण घरामध्ये उपचार घेत आहेत कारण जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये बाधित रुग्णांसाठी बेडच उपलब्ध नाहीत. ज्यांना ऑक्सिजन बेडची गरज आहे त्यांची अवस्था तर अतिशय बिकट झाली आहे. परिणामी ऑक्सिजन अभावी अनेकांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर साळशिरंबे तालुका कराड येथील समाजसेवक व कराड दक्षिण युवक काँग्रेसचे प्रवक्ते पैलवान तानाजी चवरे मित्र मंडळाच्या वतीने ऑक्सिजन गॅस सिलेंडरची व्यवस्था गावातील गरजू रुग्णांसाठी केली आहे. त्यामुळे परिसरातील, गावातील गरजू रुग्णांना या सेवेचा निश्चित फायदा होईल. तसेच या गावचे ग्रामसेवक शरद चव्हाण यांनी सुद्धा या सामाजिक कार्यात पुढे येऊन रुग्णासाठी रोटामीटर आणि ह्युमिडिफायर बॉटल मॉडेल कीट मदत म्हणून दिले आहे. ही दोन्ही उपकरणे गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी इनामदार व आरोग्य सेविका वैशाली जंगम यांच्याकडे गावातील गरजू रुग्णांसाठी सुपूर्द करण्यात आली आहेत. यावेळी पोलीस पाटील सौ. उमा पाटील, महादेव चौगुले उपस्थित होते. 


या संकटकाळात या समाजसेवकांनी केलेल्या सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.