" viral काकू नी १८००रुपये "


" viral काकू नी १८००रुपये "


"नेहमीप्रमाणे फेसबुकवर फेरी मारणं सुरू होत.त्यात एक व्हिडीओ बघण्यात आला.एका बॅचलर मुलांच्या रूमवर घरकाम करणाऱ्या काकू १८००रुपये मला दिले गेले नाहीत मला माझे कबूल केलेले पैसे द्या.बाकी मला काही सांगू नका हे सांगत होत्या.तर ती बॅचलर मुले काकू आम्ही तुम्हाला १८००रुपये ५००च्या ३नोटा २००रुपयांची एक नोट, १००रुपयांची एक नोट असे एकूण १८०० रुपये दिले आहेत. असे सांगत होती. त्या काकूही त्या मुलांनी दिलेले पैसे किती नोटा दिल्या हे बरोबर सांगत होत्या. नाकारत नव्हत्या हेही विशेष...!! ह्या साऱ्या प्रकारातून गंमत वाटत होती. सर्वजण ह्या व्हिडिओ चा आनंद घेत होती...आहेत...!!


             तात्काळ अनेक पेजवर, ग्रुपवर नि सोशल मीडियावर ह्या काकू प्रचंड व्हायरल झाल्या. कोणी मिम्स बनवल्या, कोणी सध्याच्या राजकीय वातावरणाशी, त्याचा संबंध जोडून ,तर कोणी चक्क १८००रुपयांच्या नोटेची प्रतिकृती तयार करून ,जस्टीस फॉर काकू,वगैरे फोटो एडिटिंग करून त्याच्यातील गंमत घेतली.


             खरेतर ह्यात चूक कोणाचीच नव्हती,त्या काकू अशिक्षित असतील त्यामुळे त्यांची होणारी हिशोबाची गल्लत, त्या बॅचलर मुलांची व्यवस्थित चोख हिशोब देणं व ते पटवून देणं हे सारं त्यांच्या जागी योग्यच आहे.मलाही थोडावेळ खूपच हसू आलं.पण त्या व्हिडिओतील "त्या काकूंची" आतड्याला पीळ देऊन बोलण,नि माझ्या कामाचे १८००रुपये मला द्या. बाकी मला काहीच म्हणायचे नाही..!! हे मला थोडं वेगळंच वाटलं.खरेच आपल्या दृष्टीने१८००रुपये, हिशोबाची गल्लत हास्यास्पद असेलही. रक्कम देखील खुपजणांना "ह्या त्यात काय...फक्त १८००रुपये तर आहेत न,त्यासाठी कशाला एव्हढे वाद?",तर काहींना "काय बाई आहे,हिशेबही कळत नाही धड?",तर काहींना त्या बॅचलर मुलांची फारच दया आली असेल. पण......वस्तुस्थिती नाकारू शकत नाही. ती म्हणजे, भलेही त्या"काकू"निरक्षर, अडाणी असतील त्यांना हिशोब, नोटांची किंमत, नेमकी संख्या,कळत नसेलही. पण त्यांनी केलेले कष्ट नि त्यासाठी कळवळून माझे पैसे द्या म्हणणं देखील आपण नाकारू शकत नाही.


            आजही अनेक कष्टकरी स्त्रिया-पुरुष आपल्या अवतीभवती वावरत असतात.त्यांना फक्त कष्ट एके कष्ट नि एकवेळच्या जेवणाची भ्रांत असते. त्यांच्यासाठी १रुपया देखील लाख मोलाचा असतो.आपल्यासाठी भलेही तो १रुपया असला तरी त्याच "मूल्य" त्यांच्यासाठी "लाखो" रुपयांएवढंच असत. अनेक कष्टकरी-घरकाम करणाऱ्या स्त्रिया ह्या निरक्षर, कमी शिकलेल्या असतात.गरीबी, लाचारी, व्यसनी पती,त्याची मारझोड,घरातील आजारपण,मागासलेपण,हाताची तोंडाला गाठ मारणं ,घराचा डोलारा सांभाळणं ह्यासाठी कष्टत असतात.खूप कमी पैशात उरफुटेस्तोवर राबतात.हाती येणारी "लक्ष्मी"त्यांना लाखमोलाची असते.बरेचदा मिळणारे पैसे कसे विनियोग करावेत, बचत करावेत हे धड कळत नसते.अशावेळी कुठेतरी गाठीला-गाठ मारून,कपड्यांच्या घडीत,धान्याच्या डब्यात,वळकटी मध्ये,कुठेही गुंडाळून सहजपणे कोणालाही सापडणार नाहीत अशा ठिकाणी ठेवतात.कारण एकच असते,कुठेतरी गरज पडली तर उपयोगाला येतील. त्यातील धडपड, संघर्ष कदाचित आपल्या सर्वांना समजणार नाही. पण,त्याचे महत्व नि आतून दाटून येणारी त्यांची आर्तता देखील आपण डावलू शकणार नाही.


             आज "त्या","काकूंच्या"निमित्ताने अनेक कष्टकरी, श्रमिक स्त्रिया ,त्यांचं जगणं-वागणं नि संघर्ष पुन्हा एकदा मला अंतर्मुख करून गेला एव्हढं मात्र नक्कीच....!!


 


✒️शुभांगी पवार (कंदी पेढा)