‘सिंगिंग स्टार’ चा रंगमंच गाजवतेय कविता....


‘सिंगिंग स्टार’ चा रंगमंच गाजवतेय कविता....


तळमावले/डाॅ.संदीप डाकवे


सोनी मराठी या वाहिनीवर ‘सिंगिंग स्टार’ हा नवीन रियालिटी कार्यक्रम 21 आॅगस्टपासून सुरु आहे. या कार्यक्रमामध्ये अनेक दिग्गज सेलिब्रिटी आपल्या स्वतःमधील गायनाच्या पैलूचे दर्शन घडवत आहेत. कविता राम या नामवंत गायिका असून त्या या शोमध्ये अभिनेता अभिजित केळकर याच्या गुरुचे काम करत आहेत. गाण्यातील बारकावे, टीप्स त्या अभिजित केळकर याला शिकवताना दिसत आहेत. सोबतच आपल्या मधुर आवाजात गाणी देखील सादर करत आहेत. गायिका कविता राम यांनी ‘गोमू संगतीनं....’ या गाण्याचे केलेले सादरीकरण या कार्यक्रमात परिक्षकांना खूप आवडले. साहजिकच कविता आपल्या आवाजाच्या जादूने सिंगिंग स्टार चा रंगमंच व संपूर्ण महाराष्ट गाजवत आहे.


पाटण तालुक्यातील चिचांबा माटेकरवाडी हे कविता राम हिचे मूळ गाव आहे. म.टा.सन्मान 2020 मध्ये सर्वोत्कृष्ट पाश्र्वगायिका म्हणून निवड झाली आहे. तसेच नुकतेच त्यांनी आदर्श शिंदे यांच्यासमवेत चित्रपटासाठी गाणे गायले आहे. तसेच जय जय महाराष्ट माझा या सोनी मराठीवरील कार्यक्रमात त्यांनी अनेक दिग्गज गायकांसमवेत गायनाचे काम केले आहे. कागर या चित्रपटातील रिंकू राजगुरु हिच्यावर चित्रीत झालेल्या ‘दरवळ मव्हाचा’ आणि तांडव या चित्रपटातील जय भवानी आणि जय शिवाजी व इतर गाणी सर्वत्र वाजत आहेत. चित्रपट सृष्टीचे तसे सर्वांनाच आकर्षण. याच क्षेत्रामध्ये आपल्या जादुई आवाजाने वेड लावले आहे ते कविताने. माटेकरवाडीच्या कविताने आपल्या आवाजाची मोहिनी सर्वांवर घातली आहे.


कविता राम यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण मुंबई या ठिकाणी झाले आहे. शालेय वयात असतानाच त्या या क्षेत्राकडे आकर्षित झाल्या. इ.7 वीत असताना त्यांनी आंतर शालेय गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला. तर अरुण दाते आणि राणी वर्मा परीक्षक असलेल्या राज्यस्तरीय गायन स्पर्धेत व्दितीय क्रमांक मिळवला. शाळेत असताना एकांकिका, अभिनय अशा अनेक स्पर्धेत सहभाग घेतला होता. अनेक स्पर्धेत त्यांनी पारितोषिके मिळवली आहे. अभिनय, सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेत असताना बÚयाच शिक्षकांनी ‘‘तूझा आवाज गोड आणि चांगला आहे, या क्षेत्रात तू करियर कर’’ असे सांगीतले. त्यामुळेच आपण या गायनाच्या क्षेत्रात आल्याचे कविता राम म्हणाल्या.


कविता राम यांनी  इ.8वी मध्ये असताना पहिला स्टेज शो केला. यावरुन आपणांस त्यांच्या कला क्षेत्रातील प्रतिभेची जाणीव झालेली दिसून येते. घरामध्ये कोणतेही कलाविषयक वातावरण नसताना त्यांनी या क्षेत्रात केलेली वाटचाल आणि मिळवलेले यश कौतुकास्पद आहे. घरामध्ये सर्वात मोठी असल्यामुळे घराची जबाबदारी जाणिवपूर्वक आणि कौशल्यापूर्वक पेलली आहे. अनेक वर्षापासून कविता विविध प्रकारचे स्टेज शो, कार्पोरेट कार्यक्रम, प्राॅडक्ट लाॅजिंग प्रोग्रॅम मुंबई व परदेशात करत आहेत. आतापर्यंत त्यांनी सुमारे 2000 च्या वरती शोज केले आहेत. त्यांच्याकडे बाॅलिवूड, पंजाबी, पाॅप साॅंग गाण्याची क्षमता आहे. अनेक मराठी-हिंदी गाण्याचे अल्बम त्यांच्या नावावर आहेत. घरच्या परिस्थितीमुळे त्यांना उच्चशिक्षण व गाण्याचे शास्त्रीय शिक्षण घेता आले नाही याची खंत त्या व्यक्त करतात, पण स्मरणशक्ती चांगली असल्याने त्यांनी यावर मात केली असून  त्या सध्या श्री विरेन सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संगीताचे शिक्षण घेत आहेत.


या कला क्षेत्राकडे जाण्यासाठी संपूर्ण कुटुंबियांचा विरोध असताना आई सौ.अलका माटेकर, आजी कै. विमल धनू (धनू)यांनी पूर्णपणे पाठिंबा दिला असल्याचे त्या सांगतात.


मुंबई तील प्रतिष्ठित मोठे हाॅल, फाईव्ह स्टार हाॅटेल, बॅन्केट हाॅल यामध्ये आय ए अॅण्ड एफ एज, हाॅटेल आॅफ प्राॅडक्शन, रोटरी क्लब आॅफ वापी, सुराना अॅन्ड सुराना इ.कार्यक्रमांच्या द्वारे त्या आपल्या कार्यक्रमाचे सादरीकरण करत असतात.


अनेक अवघड गाणी, कव्वाली, गझल अशी विविध प्रकारची गाणी प्रभावीपणे गाण्यात कविता यांचा हातखंडा आहे. आतापर्यंत त्यांनी स्टार प्लस वरील ‘ये रिश्ता क्या कहलाता है’, सोनी टीव्हीवरील ‘गोदभराई’, कलर्स हिंदीवरील ‘भाग्यविधाता’, ‘मेरे घर आई एक नन्ही परी’, ‘कैरी’ या मालिकांतील गीतांचे पाश्र्वगायन त्यांनी केले असून त्या मालिका ग्रामीण भागातील घराघरात पोहोचल्या आहेत. तसेच ‘या टोपीखाली दडलंय काय’,  ‘लाज राखते वंशाची’, ‘सौभाग्य माझं दैवत’, ‘दुर्गा म्हणतात मला’, ‘शिनिमा’ या मराठी तर ‘गब्बर इज बॅक’, ‘सिंग इज किंग’या चित्रपटातील लावणींचे आणि गीतांचे गायन गायिका कविता राम यांनी केले आहे. तसेच ‘सिंग इज किंग’या अक्षय कुमारच्या चित्रपटातील व्होकल स्वराचे गायनदेखील त्यांनी केले आहे. याशिवाय कविता राम, आनंद शिंदे, आदर्श शिंदे या सर्वांचा एकत्रित असलेल्या ‘हळदी रिमिक्स’ या कॅसेटमधील ‘गाडी बंगला....’, ‘ये पोरगा माझ्यावर मरतोय’ ही गीते खूप हिट झाली आहेत.


सुप्रसिध्द गायिका आशा भोसले यांच्याषी झालेली भेट ही आयुष्यातील अविस्मरणीय भेट असल्याचे कविता सांगतात. अजूनही या क्षेत्रात खूप मोठं नाव व चांगला कलावंत बनण्याचं त्यांचं स्वप्न आहे.


विविध गाण्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील लोकांच्यावर आपल्या आवाजाची मोहिनी पसरत असलेल्या गायिका कविता राम भविष्यामध्ये उज्ज्वल यश मिळवतील यात शंकाच नाही.


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


चित्रपटासाठी गायलेली गीते:


कागर चित्रपटातील दरवळ मव्हाचा,  तांडव, दोस्तीगिरी, लादेन आला रे, हक्क, आता माझी हटली, नगरसेवक, थॅंक यू विठ्ठला, शिनिमा


मालिकासाठी केलेली टायटल साॅंग व गीते:


स्वराज्यरक्षक संभाजी, जुळता जुळता जुळतंय, ये रिश्ता क्या कहलाता है,  बाजी, गोदभराई, साथिया, मेरे घर आई नन्ही परी इ.


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖