रुग्णांच्या सेवेसाठी आ. शिवेंद्रसिंहराजे व कुटूंबीयांकडून ८० बेडचे कोव्हीड केअर सेंटर


रुग्णांच्या सेवेसाठी आ. शिवेंद्रसिंहराजे व कुटूंबीयांकडून ८० बेडचे कोव्हीड केअर सेंटर


बुधवारी करणार जिल्हाधिकार्‍यांकडे सुपुर्त; ८० पैकी ४० बेड ऑक्सिजन पुरवठ्यासह


सातारा/प्रतिनिधी :


कोरोना महामारीमुळे संपुर्ण देशात हाहाकार उडाला आहे. महाराष्ट्रासह आपल्या सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधीतांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. मृत्यूच्या प्रमाणातही चिंताजनक वाढ झाली आहे. सातारा जिल्हा रुग्णालयासह सर्वच खाजगी रुग्णालयांमध्येही बेड शिल्लक नाही आणि त्यामुळे रुग्ण दगावत आहेत. या भयावह परिस्थितीला कुठेतरी आळा बसावा, रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत या उदात्त हेतुने आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले व कुटूंबीयांनी स्वमालकीच्या विसावा नाका येथील पुष्कर हॉल येथे स्वखर्चाने ८० बेडचे सुसज्ज असे कोव्हीड केअर सेंटर उभारले आहे. या सेंटरमध्ये ४० बेड हे ऑक्सिजन पुरवठ्यासह सुसज्ज असून उर्वरीत ४० बेड विना ऑक्सिजनयुक्त आहेत.


दरम्यान, हे कोव्हीड केअर सेंटर रुग्णांच्या सेवेसाठी विनामोबदला जिल्हा प्रशासनाकडे चालवण्यासाठी देण्यात येणार असून येत्या बुधवारी हे सेंटर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या ताब्यात देण्यात येणार आहे आणि त्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली या सेंटरमध्ये बाधीतांवर उपचार सुरु होणार आहेत, अशी माहिती आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.


आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले आहे की, स्व. भाऊसाहेब महाराजांना १९७८ पासून सातार्‍यातील जनतेने भरभरुन प्रेम आणि साथ दिली. त्यांच्या पश्‍चात सातारकर आणि सातारा- जावली तालुक्यातील जनतेने माझ्यावर आणि माझ्या कुटूंबावर वडीलकीचे छत्र धरुन कायम पुत्रवत प्रेम आणि आपुलकीची साथ दिली आहे. ज्या छत्रपतींच्या घराण्यात आम्ही जन्माला आलो, ज्या घराण्याचे वंशज म्हणून आम्हाला ओळखले जाते, त्याच घराण्याचा समाजसेवेचा वारसा पुढे चालवण्याचा प्रयत्न नेहमी करत आलो आहे. ज्या जनतेने आजवर आमच्या कुटूंबाला भरभरुन दिले त्या जनतेसाठी आज कोरोना महामारीच्या गंभीर आणि कठीण परिस्थितीत आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो याच उद्देशाने, कोरोना रुग्णांना उपचाराची सुविधा मिळावी म्हणून हे सेंटर शासनाला मोफत उपलब्ध करुन देत आहे.


वास्तविक या सेंटरमध्ये ८० बेड असून त्यापैकी ४० बेड हे ऑक्सिजनच्या सुविधेसह उपलब्ध होणार आहेत. तसेच ऑक्सिजन पुरवठा करणार्‍या पाईपलाईन टाकण्याचे काम सुरु असून येत्या बुधवारपर्यंत काम पुर्ण होईल. त्यामुळे बुधवारी हे सेंटर आमच्या कुटूंबाच्यावतीने रुग्णसेवेसाठी जिल्हा प्रशासनाकडे सुपुर्त केले जाणार आहे. जिल्हा प्रशासनाला आम्ही हे सेंटर पुर्णपणे मोफत, विनामुल्य आणि जोपर्यंत प्रशासनाला आवश्यकता असेल तोपर्यंत उपलब्ध करुन दिले असून रुग्णसेवेसाठी जिल्हाधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली ते सुरु राहणार आहे. सोशल मिडीयावर रविवारी उदघाटन होणार असल्याच्या पोस्ट पडल्या आहेत. मात्र त्या पोस्ट अधिकृत नाहीत, असेही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले आहे. दरम्यान, आमच्या कुटुंबामार्फत शासनाची अथवा इतर कोणतीही आर्थिक मदत न घेता स्वखर्चाने फक्त रुग्णसेवेसाठी हे सेंटर प्रशासनाला देण्यात येत असून याद्वारे कोरोना रुग्णांना नक्कीच दिलासा मिळेल, असेही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले आहे. 


विनाकारण बेड अडवू नका...


जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. जिल्हा रुग्णालयासह इतर सर्वच हॉस्पिटल्समध्ये बेड शिल्लक नाहीत. केवळ रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आणि कोणतेही लक्षण दिसत नसताना फक्त भीतीपोटी काही रुग्णांकडून बेडवर कब्जा करण्याचे प्रकार होत आहेत. हॉस्पिटलमधील बेडची खरी गरज चिंताजनक प्रकृती असलेल्या तसेच वृध्द रुग्णांना आहे. कोणतेही लक्षण नाही किंवा फारसा त्रास होत नाही अशा रुग्णांना प्रशासनाने होम आयसोलेशनचा पर्याय दिला आहे. अशा रुग्णांनी होम आयसोलेशनमध्ये उपचार घ्यावेत जेणेकरुन गरजू रुग्णांना बेड मिळेल आणि त्यांना वेळेत उपचार मिळाल्याने त्यांचे प्राण वाचतील. त्यामुळे विनाकारण कोणीही बेड अडवू नका. तसेच कोरोनाला आळा घालण्यासाठी विनाकारण कोणीही घराबाहेर पडू नका, सर्वांनी काळजी घ्या, असे आवाहन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी यानिमीत्ताने केले आहे.