माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत गृहराज्यमंत्री पोहचले घरोघरी

 माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेत पाटण तालुक्यात गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी घरोघरी दिल्या भेटी. 


पाटण / प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यासह पाटण तालुक्यातही कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून सर्वांनीच सतर्क रहाणे गरजेचे आहे. कोरोनाशी सामना करण्यासाठी सर्व घटकांनी एकत्रित येणे गरजेचे असून यात नागरीकांचा सहभाग अत्यंत महत्वाचा आहे. या पार्श्वभूमीवर भविष्यातील धोका टाळण्यासाठी "माझे कुटुंब, माझी जबाबदारी' ही मोहीम राज्य शासनाने हाती घेतली आहे. या मोहिमेस आपण सर्वानी सहकार्य करावे असे सांगून कोरोना संकटाला सामोरे जाण्यासाठी राज्य सरकार कोठेही कमी पडणार नाही, असा विश्वास गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला.


येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सभागृहात "माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या मोहिमेच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, तहसीलदार समीर यादव, जिल्हा परिषद सदस्य विजय पवार, पंचायत समिती सदस्य सुरेश पानस्कर, सदस्या सौ. निर्मला देसाई, गटविकास अधिकारी मीना साळुंखे, पाटण ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. सी. के. यादव, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. बी. पाटील, मुख्याधिकारी अभिषेक परदेशी यांची प्रमुख उपस्थिती होती.


गृहराज्यमंत्री ना. देसाई पुढे म्हणाले, राज्य शासनाच्यावतीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी माझे कुटुंब माझी जबाबदारी ही संकल्पना सुरू केली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून वैद्यकीय अधिकाऱ्यांसह सर्व आरोग्य कर्मचारी, आशा, अंगणवाडी सेविका कोरोना बाधितासाठी काम करत आहेत. मुंबईसारख्या मोठ्या शहरात कोरोनाचा संसर्ग कमी होत असून ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव दिसून येत आहे. सातारा जिल्ह्यासह पाटण तालुक्यातही कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आपण सर्वांनी सतर्क रहाणे गरजेचे आहे. मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून जिल्हापातळीवर जम्बो कोवीड सेंटर सुरू करण्याचे काम सुरु आहे. पाटण तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या पाहता ढेबेवाडी 35, पाटणमध्ये 25 व दौलतनगर येथे 50 असे एकूण ऑक्सिजनसह 110 बेडसाठी मंजुरी देण्यात आली असून या कोवीड रुग्णालयाचे कामही सध्या सुरू आहे. या रुग्णालयांमध्ये डॉक्टर, नर्ससह आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या कमी पडता कामा नये यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत.


ते पुढे म्हणाले, दररोज हात पाय साबणाने धुवावेत. सॅनिटायझरचा वापर करावा. विनाकारण घराबाहेर पडू नये. तोंडाला मास्करचा वापर करावा. सामाजिक अंतर पाळावे. या सर्व गोष्टींचे पालन करून स्वत:च्या आरोग्याची जपणुक स्वत:च करायची आहे. कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही यासाठीच ही संकल्पना मुख्यमंत्र्यांनी पुढे आणली आहे. पाटण तालुक्यात शंभर पथके तयार करण्यात आली असून दररोज पन्नास घरांमध्ये जावून पथकामार्फत तपासणी करण्यात येणार आहे. या पथकांना आपण सर्वांनी सहकार्य करावे. लोकप्रतिनिधींनी या पथकांमध्ये सहभाग घेवून जनजागृती करावी. कोरोनाचा सामना करण्यासाठी सर्वांनी एकत्रित येणे गरजेचे आहे. कोरोनामुळे कोणतीही परिस्थिती निर्माण होवू नये यासाठी राज्य सरकारही तयार आहे. राज्य सरकारकडून ठिकठिकाणी औषधांचा साठाही पुरविला जात आहे. जिल्हा नियोजनातील 30 टक्के पैसेही कोरोनावर खर्च करण्याचा निर्णय झाला आहे. एकवेळ विकासकामे पुढे ढकलली तरी चालतील मात्र कोरोना संकटकाळात पैसे कमी पडता कामा नये ही सरकारची भूमिका आहे. कोरोना संकटाला सामोरे जाण्यासाठी राज्य सरकार कोठेही कमी पडणार नाही, असा विश्वासही ना. देसाई यांनी यावेळी व्यक्त केला.


प्रास्ताविकात गटविकास अधिकारी मीना साळुंखे यांनी या मोहिमेची माहिती दिली. तहसीलदार समीर यादव यांनी आभार मानले.


यावेळी विविध पक्षाचे पदाधिकारी, विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


गृहराज्य मंत्री गेले घरोघरी


प्रत्येकाच्या घरात जाऊन कोरोना संसर्ग होऊ नये यासाठी घ्यावयाची काळजी, घरात कोणी वयस्कर किंवा व्याधिग्रस्त आहे का... असतील तर त्यांची तपासणी करून घ्या. त्यांची काळजी घ्या.. यासह कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने विचारपूस केली... त्यांच्या घरोघरी जाण्यामुळे यंत्रणा त्यांच्या कडून प्रेरणा घेऊन अधिक गतीने काम करेल.


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖