तालुक्यातील रोजगार, शेतकरी, ऊस उत्पादक, कामगार देशोधडीला लागला आहे त्यासाठी जन आंदोलन करा उगीच चांगल्या कामात नाक खुपसू नका: रमेश मोरे


तालुक्यातील पर्यटन, वीटभट्टी, बोटिंग रोजगार, शेतकरी, ऊस उत्पादक, कामगार देशोधडीला लागला आहे त्यासाठी जन आंदोलन करा उगीच चांगल्या कामात नाक खुपसू नका: बाजार समिती पदाधिकाऱ्यांचा इशारा


पाटण / प्रतिनिधी


मानेगांव ता.पाटण येथे  कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने लवकरच होणाऱ्या पेट्रोल पंपामुळे स्थानिकांची गैरसोय दूर झाल्याने त्या विभागातील जनतेकडून समाधान व्यक्त होत आहे. परंतु चांगल्या कामाला विरोध न करतील ते देसाई गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते कसले ? याच भावनेतून देसाई साखर कारखान्याचे माजी चेअरमन डाॅ. दिलीप चव्हाण यांनी प्रसिद्धीच्या हव्यासापोटी आता या चांगल्या पेट्रोल पंपाला विरोध करून यासाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे. डाॅ. चव्हाण तुमच्यात हिम्मत असेल तर तालुक्यातील पर्यटन, वीटभट्टी, बोटींग, रोजगार, व्यवसाय बंद पाडणाऱ्या तुमच्या नेत्यांविरूद्ध आंदोलन करून दाखवा. तुम्हीच चेअरमन असलेल्या कारखान्याची वाट लागल्याने शेतकरी, ऊस उत्पादक, कामगार देशोधडीला लागला त्यासाठी जन आंदोलन करा उगाच चांगल्या कामात नाक खुपसून आपल्या अकलेचे दिवाळे काढून घेवू नका असा स्पष्ट इशारा पाटण पंचायत समितीचे माजी उपसभापती रमेश मोरे व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी एका पत्रकाद्वारे प्रसिद्धीस दिला .


   या पत्रकात रमेश मोरे व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी पुढे म्हटले आहे की, मुळातच मानेगाव ( मानेवाडी ) येथील बाजार समितीच्या एकूण 86 गुंठ्यापैकी केवळ 15 गुंठे जागेवरच हा पंप उभा रहाणार आहे. वास्तविक ढेबेवाडी, कुंभारगाव विभागातील जनतेची गेल्या अनेक वर्षापासून ही पंपाची मागणी होती. याशिवाय याच विभागात वांग, मराठवाडी, महिंद, बोर्गेवाडी, काळगाव यासारखे धरण व लघू पाटबंधारे प्रकल्प झाल्याने येथील अनेक गावांचे पुनर्वसन झाल्याने स्थानिक पशुधन कमी झाले आहे. तर यापुर्वी जनावरांच्या बाजारासाठी प्रसिद्ध असलेला याच ठिकाणचा गेल्या चार ते पाच वर्षांपासून जनावरांचा आठवडा बाजार पुर्णपणे बंद झाला आहे. सध्या शेतकरी वर्गाचाही व्यापारी दृष्टीकोन यात आधुनिक यांत्रीकीकरण यासाठी ट्रॅक्टर, पेरणी, मळणी, भात कापणी यंत्र, मशीन, जे. सी. बी. आदी चार, दोन चाकी वाहने याचाही विचार महत्वाचा आहे. या सर्व गोष्टींमुळे पूर्वीची बाजार समितीची उलाढाल यात मोठ्या प्रमाणावर तफावत निर्माण झाली आहे. राज्य पणन संचालक यांचेकडून 151 बाजार समित्यांना पेट्रोल पंप मंजूर करण्यात आले त्यापैकी मानेगाव, तारळे येथे इंडियन ऑइल काॅर्पोरेशन यांचेमार्फत किसान सेवा केंद्र या नावाने हे पंप कार्यान्वीत होणार आहेत. मध्यंतरी सेना, भाजप शासनाच्या कार्यकाळात पणन मंत्री सुभाषराव देशमुख यांनी फळे, भाजीपाला, शेतमालाचे नियमनमुक्त केल्याने बाजार समित्यांना फार मोठा तोटा सहन करावा लागला आहे. त्यामुळे त्याला उर्जीतावस्था निर्माण होण्यासाठीच अशा प्रकारचे पुरक व्यवसाय बाजार समितीच्या वतीने करण्यात येत आहेत. वास्तविक बाजार समित्यांचे अस्तित्व टिकविण्यासाठी पणन विभागाने शेतमाल तारण योजना, कांदा चाळ, धान्य चाळणी यंत्र, पेट्रोल पंप, गोदाम केंद्रीय आदी योजनाही राबविल्या आहेत. त्यामुळे स्थानिकांची सोय, मागणी व बाजार समिती याचा सार्वत्रिक विचार करूनच हा पंप येथे उभारण्यात येणार आहे. याशिवाय डाॅ. चव्हाण व त्यांच्या समर्थकांना येथे ' ढाबा ' कोठून आढळला ? ती ढाबा संस्कृती तुमची आहे आमची नाही. शिवाय बाजार समितीच्या आवारात पेट्रोल पंप उभारूनही तब्बल ऐंशी टक्के जागा शिल्लक रहाणार आहे त्यामुळे येथे जनावरांचा बाजार असो अथवा अन्य बाबीही होवू शकतात त्यामुळे त्याची काळजी डाॅ. चव्हाण तुम्ही करू नका. बाजार समिती व स्थानिक जनतेची काळजी घ्यायला आम्ही व आमचे नेतेही खंबीर आहोत. वास्तविक विधानसभा निवडणुकीत ढेबेवाडी, कुंभारगाव, तारळे, मल्हारपेठ विभागातून कमी मते मिळूनही मनात कोणताही राजकीय आकस न ठेवता आमच्या नेत्यांनी तारळे, मानेवाडी येथे पेट्रोल पंप व मल्हारपेठ येथे गोदाम अशी कोट्यावधीची कामे सुरू केली आहेत याचे कौतुक करा. आंदोलनच करायचे असेल तर मग साखर कारखान्यांवर कोवीड सेंटर उभारण्याचे आवाहन राज्यकर्त्यांनी केले आहे तर मग तुमचा कारखाना मुग गिळून गप्प का, याशिवाय तेथील स्व. शिवाजीराव देसाई मेमोरियल हाॅस्पीटल, कारखान्यावरील मंगल कार्यालय, सातारा येथील खाजगी भगवते साई मंगल कार्यालय कोरोना बाधीतांना देण्यासाठी हिम्मत असेल तर आंदोलन करा असेही जाहीर आव्हान पाटण पंचायत समितीचे माजी उपसभापती रमेश मोरे,पाटण पंचायत समितीच्या माजी सभापती संगिता पुजारी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजाराम मोरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अधिक माने, माजी जि. प.सदस्य जे.पी.पाटील (नाना),दिलीप पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक सुरेश निंबाळकर,जिल्हा सहकार बोर्डचे संचालक विकास पवार, माजी सरपंच रमेश तवटे,माजी सरपंच अनिल डाकवे,बापूसो सावंत आदी पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी या पत्रकाद्वारे प्रसिद्धीस दिले आहे.