यशवंतराव चव्हाण सामाजिक कृतज्ञता पुरस्कार स्व. पी. डी. पाटील यांना जाहीर.

 



यशवंतराव चव्हाण सामाजिक कृतज्ञता पुरस्कार स्व. पी. डी. पाटील यांना जाहीर


कालिकादेवी पतसंस्थेकडून साहेबांचा मरणोत्तर सन्मान


 


कराड, दि. 17 : श्री कालिकादेवी नागरी सहकारी पतसंस्थेच्यावतीने प्रतिवर्षी यशवंत विचारांचा जागर करणाऱ्या व्यक्तिस "यशवंतराव चव्हाण सामाजिक कृतज्ञता पुरस्कार'' देऊन सन्मानित करण्यात येते. सन 2019-20 चा हा पुरस्कार यशवंत विचाराचे पाईक, कराड शहर परिसराचे भाग्यविधाते आ. स्व.पी. डी. पाटीलसाहेब यांना जाहीर झाला असून संस्थेकडून व कराड परिसराकडून पी. डी. साहेबांचा हा मरणोत्तर सन्मान असल्याची माहिती पुरस्कार समितीचे निमंत्रक प्रा. अशोक चव्हाण, श्री कालिका कुटुंबप्रमुख मुनीर बागवान (सावकार) व चेअरमन डॉ. जयवंत सातपुते यांनी दिली. यावेळी संचालक अरुण जाधव, डॉ. संतोष मोहिते, कार्यलक्षी संचालक विवेक वेळापुरे उपस्थित होते.


एक लाख रुपये, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप असून आजपर्यंत ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित, कविश्रेष्ठ ना. धो. महानोर, प्रा. डॉ. सदानंद मोरे, नाना पाटेकर-मकरंद अनासपुरे यांचे नाम फौंडेशन, शांतीलाल मुथ्या, इंद्रजित देशमुख (काकाजी), सिक्कीमचे राज्यपाल खा.श्रीनिवास पाटील यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.


स्व. यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या समाजभिमुख विचारांचा जागर करणारे म्हणून राज्यातील जनता स्व. पी. डी. पाटीलसाहेब यांच्याकडे आदराने पहाते. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतरावांनी सर्वसामान्य माणसांची कृषी उत्पादकांची, आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या लोकांची व्यथा दुर करण्यासाठी वैयक्तिक व शासकीय पातळीवर प्रयत्न केले. स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या स्वप्नातील कराड शहर व परिसराचा सहकार,साखर उद्योग,स्थानिक स्वराज्य संस्था, शिक्षण, कृषी, पाणी पुरवठा, क्रीडा, सांस्कृतिक व अन्य क्षेत्राचा विकास पी. डी. साहेबांच्या नेतृत्वाखालीच झाला. कराड नगरपरिषद शिक्षण मंडळाच्या सुसज्ज इमारती, नगरपरिषदेची भव्य इमारत, 43 वर्षे नगराध्यक्षपद हा वेगळा विक्रम आहे. कराड नगरपरिषदेची भुयारी गटार योजना, शुद्ध पिण्याच्या पाणी पुरवठा योजना आजही राज्यात आदर्श मानली जाते.


यशवंतराव चव्हाण समाधीस्थळ, यशवंतराव चव्हाण स्मृतिसदन, यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स अशा अनेक स्मारकामधून स्व. पी. डी. साहेबांनी यशवंतरावांच्या स्मृतिंचा चिरंतन ठेवा घडविला आहे. आयुष्यभर स्व. यशवंतराव चव्हाणांची विचार धारा जोपासणारे व्यक्तिमत्व म्हणून पी. डी. साहेबांची ओळख आहे. आज साहेब हयात नसले तरी स्व. पी. डी. साहेबांच्या वैशिष्ट्यपूर्ण कार्याचा गौरव म्हणून संस्थेच्यावतीने दिला जाणारा "यशवंतराव चव्हाण सामाजिक कृतज्ञता पुरस्काराने' स्व. पी. डी. साहेब यांना मरणोत्तर सन्मानित करण्यात यावे, असा ठराव संचालक मंडळाच्या बैठकीत एकमताने संमत करण्यात आला. रविवार, दि. 22 नोव्हेंबर 2020 रोजी दुपारी 4 वाजता स्व. सौ. वेणूताई चव्हाण सांस्कृतिक सभागृह, कराड येथे हा सोहळा आयोजित केला असून स्व. पी. डी. साहेब यांचे सुपुत्र, जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील हा पुरस्कार स्वीकारणार आहेत. ज्येष्ठ विचारवंत इंद्रजित देशमुख सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून माजी राज्यपाल खा.श्रीनिवास पाटील कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. ज्येष्ठ पत्रकार रवींद्र बेडकिहाळ विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती ही संयोजकांनी दिली.