"कॅप्टन कुल"
"माझ्या लहानपणीचा काळ आणि क्रिकेट यांचं खूपच जवळच नात होत.तो काळ असा होता की तेव्हा मोबाईल, संगणक,सोशल मीडिया, ऑनलाइन गेम,पबजी वगैरे आताचे परवलीचे असणारे शब्द तेव्हा अस्तिवात नव्हते.कलर टीव्हीचा काळ सुरू होता नि केबल होत, मोजकेच म्हणजे डी.डी नॅशनल हाच चॅनेल होता. "क्रिकेट"हा सर्वांच्या नसानसांत भिनलेला खेळ होता अजूनही आहे पण तेव्हा तो "राजससुकुमार" होता.
इतर खेळांपेक्षा क्रिकेटला अन क्रिकेटपटूंना असणारे महत्व बरेचदा टीकेचे कारण बनत असायचं. बी.सी.सी.आय, भारतीय क्रिकेट संघ,क्रिकेटपटू ह्या सर्व गोष्टी म्हणजे मला बालपणी फारच सुरम्य वाटायच्या. एकमेव वर्तमानपत्रातून येणाऱ्या क्रिकेटच्या बातम्या,क्रिकेटपटूंच्या माहिती, छायाचित्रे, त्यांची धावसंख्या, बळींची संख्या, सर्वोत्तम कामगिरी, ह्याचं वाचन करणं, त्यांची कात्रणं जमा करणे त्या वह्या वारंवार पाहण,भलेही क्रिकेटमधील बऱ्याच गोष्टी कळल्या नाही तरी चालतील, चौकार, षटकार, अर्धशतक, शतक, द्विशतक,धावसंख्या, बळी,यष्टी,यष्टीचित होणं, क्लीनबोल्ड, दुसऱ्या संघाला हरवणं.... हेच भारी वाटायचं नि आपली निळ्या जर्सीतील टीम जिंकली हेच एक वेगळं मस्त समाधान असायचं.
द्वारकानाथ संझगिरी, सुनंदन लेले ह्यांच्या लेखांमधून मग क्रिकेटचा खेळ मला तांत्रिक दृष्टीने समजू लागला. जुने-नवीन नियम समजू लागले.त्यातही आपला आवडता एकमेव "सचिन तेंडुलकर -जर्सी नंबर10" त्याच्याशिवाय क्रिकेट पाहणं अशक्य कोटीतील बाब होती. हळूहळू क्रिकेटच्या अनेक बाबी,खेळ पाहून मग सौरभ गांगुली, राहुल द्रविड, अनिल कुंबळे, हरभजन सिंग, अजित आगरकर, झहीर खानही मंडळी पण आवडू लागली,टीम म्हणून ह्याचं वैविध्यपूर्ण एक असणं भावत जाऊ लागलं. त्याचवेळी "खांद्यावर रूळणारे सोनेरी रंगवलेले केस असणारा एक अवलिया यष्टीमागे दिसू लागला. हे काय रे देवा....अस त्याच हे रूप पाहून वाटलं होतं. पण म्हणतात ना "काय भुललासी वरलीया रंगा" तसा हा रांचीचा पोरगा होता की....!! मी पहिल्यांदा नकाशा उघडून "रांची" नकाशात पाहिलं होतं.इकडून आला हा म्हणून....!!
त्याच्या अचूक व स्वतःच्या शैलीने खेळणं त्याला लवकरच प्रसिद्धी पर्यंत घेऊन गेलं. त्याचा "हेलिकॉप्टर शॉट" म्हणजे भन्नाटगिरी होती.सचिन,सेहवाग आउट झाले की क्रिकेटच्या मॅच मधील संपणारा रस अन आता हरणारच मॅच अशी भावना पक्की होऊन,चरफडत टीव्ही बंद करावा वाटायचा तेव्हा "धोनी" यायचा नि सगळा खेळ पुन्हा रंगात येऊन सामना जिंकला जायचा. हेच त्याच वेगळेपण, त्याला कप्तान पदापर्यंत घेऊन गेले. नि त्यानेही खरंच त्या प्रत्येक संधीचे सोने केले.त्यात 2007 मध्ये आयसीसी वर्ल्ड टी -20 जिंकला
2010 आणि 2016 मधील आशिया चषक जिंकला.
आयसीसी क्रिकेट विश्वचषक, 2011 जिंकला.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2013.
याशिवाय महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात भारताने अनेक बलाढ्य संघांना वनडे, कसोटी आणि टी-20त त्यांच्याच भूमीत नमवून अनेक विक्रम रचले.
सप्टेंबर 2007 मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या आयसीसी विश्वचषक स्पर्धेसाठी एम. एस. धोनी यांना भारतीय संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले होते आणि 2016 पर्यंत कसोटी सामन्यांमध्ये धोनी कर्णधार होता.
अनेक मान-सन्मान त्याला मिळाले, पण त्याच्याकडून ह्या सगळ्यात शिकायला मिळालेली गोष्ट म्हणजे "संयम" , "एकाग्रता", "नेतृत्वगुण", "स्थितप्रज्ञ" असणं नि जे आजकालच्या जमान्यात अंगी बानवण, त्यानुसार वागणं, प्रसिद्धी-पैसा यांच्या वर्षावात न्हात असताना देखील स्वतःचा आत्मसंयम, अवघे जगणे -वागणे यात यत्किंचितही फरक पडू न देता "सरळ"राहणे म्हणजे आताच्या जमान्यात तरी खायची गोष्ट नक्कीच नाही.भलेभले मोहाच्या,यशाच्या वर्षावात वाहून जातात,पण.....धोनी मात्र "अपवाद" ठरला आणि म्हणूनच तो "घडला"....खरंच "धोनी" तू "कॅप्टन कुल" होतासच... पण तू तुझ्या एकंदरीत वागण्यातून एक आदर्श आमच्यासमोर उभा केला आहेस तो खरच फार प्रेरक आहे.त्यासाठी तुझे कितीही आभार मानले तरी कमीच पडतील.
तुझ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधील निवृत्तीच्या बातमीने फार वाईट वाटले. पण,तुझ्या आयुष्यातील तो तुझाच सर्वस्वी निर्णय आहे.योग्यवेळी योग्य निर्णय घेऊन यशाच्या शिखरावर असताना अलविदा म्हंटल की, ते योग्यच ठरत.अपयशाचे धनी बनून टीका झेलण्यात काहीच हशील नसत.ते योग्यही ठरत नाही. हेच तू तुझ्या कृतीतून दाखवून दिले आहेस.
आणखी काय बोलावं-लिहावं कळत नाही. तू खूप काही केलेले आहेस जे शब्दांत बद्ध होऊच शकत नाही. तुझ्या आयुष्यातील आगामी सर्व योजना, उपक्रम यांना माझ्याकडून खूप शुभेच्छा...!! "तू नक्कीच कोणत्याही कार्यात नवीन आयाम निर्माण करशील हा दृढ विश्वासासह.......!!!
खूप miss करू.....!!
our captain cool...!!
"तुझीच एक चाहती"
शुभांगी पवार (कंदी पेढा)