डाकेवाडीला जाताय..! सावधान..!  दरड केव्हाही कोसळू शकते

 



डाकेवाडीला जाताय..! सावधान..!  दरड केव्हाही कोसळू शकते


तळमावले/वार्ताहर


काळगांव पासून सुमारे 2 किमी अंतरावर डाकेवाडी हे गाव आहे. लोटळेवाडीच्या परडीच्या ओेढ्याापासून डाकेवाडीपर्यंत डोंगर लागतो. या भागात सध्या सतत पाऊस पडत आहे. या पावसामुळे डोंगरात असलेले मोठे मोठे दगड  कोसळत आहेत. अनेक झाडांच्या मुळाजवळची मातीदेखील खाली पडली आहे. त्यामुळे पावसाचा प्रभाव असाच कायम राहिला तर रस्त्यालगत असलेली मोठमोठी दगडे आणि झाडे केव्हाही कोसळू शकतात. त्यामुळे या रस्त्यावरुन होत असलेल्या वाहतूकीला अडथळा निर्माण होवू शकतो. त्यामुळे डाकेवाडीकडे जाताना सावधानता बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे.


मुळात डाकेवाडीला जाणारा रस्ता हा वळणाचा आहे, एक दोन वळणे अतिशय धोकादायक आहेत. नवीन येणारा वाहन चालक या ठिकाणी गडबडून जातो. त्यामुळे रात्री अपरात्री किंवा इतर वेळेला जाणारे व्यक्ती, दुचाकी, चारचाकी वाहने यांना डोंगराची माती व दगड रस्त्यावर आले तर त्याचा अडथळा होवू शकतो. निवी, कसणी, घोटील भागातील लोक पर्यायी रस्ता म्हणून या रस्त्याने येत असतात. कोरोनामुळे सध्या माध्यमिक शाळेला जाणारी मुले नाहीत. परंतू कामानिमित्त काळगांव व अन्य ठिकाणी जात असलेल्या लोकांची या ठिकाणी वर्दळ असते. तसेच लोटळेवाडीतील काही लोक जनावरे चारण्यासाठी देखील या ठिकाणी येत असतात. त्यामुळे या सर्वांनीच सावधानता बाळगणे गरजेचे बनले आहे.


तरी संबंधित प्रशासनाने याकडे लक्ष देवून रस्त्याच्या बाजूला कोसळण्याच्या स्थितीत असलेली दगडे, रिकामी झालेली झाडे झुडपे जेसीबीच्या साहय्याने बाजूला काढून भविष्यात होणारी हानी टाळावी. अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.