पाटण तालुक्यातील 'हे' गाव घरगुती गणपती घरपोच देणार.


म्हावशी ग्रामपंचायतीचा अभिनव उपक्रम..! 


गावकऱ्यांना घरगुती गणपती घरपोच देणार. 


पाटण, दि 20 (भगवंत लोहार याजकडून)


कोरोनाच्या महामारिचा जगभरासह पाटण तालुक्यातही मोठ्या प्रमाणावर फैलाव होत असल्यामुळे म्हावशी ग्रामपंचायतीने यावेळी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गावकऱ्यांना घरगुती गणपती घरपोच देण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेवून तालुक्यात आदर्श निर्माण केला आहे.


         सातारा जिल्ह्यात कोरोनाचा प्रभाव वाढतच आहे.पाटण तालुक्यात कोरोना रुग्णांचा पाचशेचा टप्पा गाठलेला संसर्ग पाटण शहरांमध्येही मोठ्या प्रमाणावर होत आहे. पाटण शहरात गेल्या आठ दहा दिवसातच सुमारे 80 बाधित रुग्ण सापडले आहेत. या काळातच आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन होत आहे. गणेश चतुर्थी दिवशी गणपती खरेदीसाठी पाटण येथे तालुक्यातील सर्वच लोक एकत्र आल्याने संसर्गात वाढ होऊ शकते. त्यामुळे म्हावशी ग्रामपंचायतीने खबरदारीचा उपाय म्हणून हा वाढता संसर्ग रोखण्यासाठी गावातील सर्वच ग्रामस्थांना एक दिवस अगोदरच घरपोच गणपती बाप्पा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ग्रामपंचायतीचे सरपंच शंकरराव घाडगे, ग्रामसेवक आणि सर्व सदस्यांनी ग्रामस्थांना पाटण येथुन गणपती न आणता फक्त संबधित कुंभारांकडे नोदणी करण्याचे आवाहन केले आहे. तशी गावात दवंडीही देण्यात आली आहे. त्यानुसार गावकीचे गणपती व विक्री मूल्य असणारे गणपती सामाजिक अंतराचे पालन करत म्हावशी येथील मारुती मंदिरात दिले जाणार असल्याने ग्रामस्थांतून समाधान व्यक्त केलं जात आहे. गाव कोरोना मुक्त ठेवण्यासाठी ग्रामपंचायतीने केलेल्या या स्तुत्य उपक्रमाचा तालुक्यातील इतर गावांनी आदर्श घ्यावा असे आवाहनही प्रशासन व आरोग्य विभागामार्फत केले जात आहे.